रखडलेल्या प्रकल्पांचा मार्ग मोकळा

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास तसेच हेरिटेज प्रकल्पांतून निर्माण झालेला विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) विकास नियंत्रण नियमावली १९९१ नुसार वापरण्यास परवानगी देणारे परिपत्रक महापालिकेने जारी केले आहे. त्यामुळे या जुन्या प्रकल्पात घेतलेला टीडीआर वापराबाबत असलेली संदिग्धता आता संपुष्टात आली आहे. या टीडीआरचा वापर करण्यावर आडकाठी आल्यामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत.

नवा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर टीडीआर वापरण्यावर बंधन आले होते. याबाबत स्पष्टीकरण करण्याची मागणी विकासकांच्या संघटनांनी केली होती. अखेरीस ती मान्य करण्यात आली असून त्यानुसार परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या नव्या परिपत्रकानुसार, ८ मे २०१८ आधी वा १२ नोव्हेंबर २०१८ या काळात निर्माण झालेला टीडीआर विकास नियंत्रण नियमावली १९९१ नुसार एक वर्षांपर्यंत वापरता येईल, तर त्यानंतर टीडीआर शिल्लक राहिला तर त्याचा वापर करण्यास ‘इंडेक्सेशन’ सूत्र वापरले जाईल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

इंडेक्सेशन म्हणजे काय?

समजा मानखुर्द येथे एका प्रकल्पात टीडीआर निर्माण झाला आणि तो शहरात दादर येथे वापरायचा असेल तर, त्याची बाजारभावाने किंमत गृहीत धरली जाईल. या किमतीत दादरमधील टीडीआरच्या किमतीत जितका टीडीआर उपलब्ध होईल तेवढाच वापरण्यास मिळेल. याचा अर्थ मानखुर्दमध्ये एक चौरस मीटर टीडीआर निर्माण झाला. त्याची बाजारभावानुसार किंमत शंभर रुपये असेल तर दादरमध्ये शंभर रुपयांत प्रत्यक्षात तेथील बाजारभावानुसार जितका टीडीआर मिळेल, तितकाच वापरता येईल. या पद्धतीला इंडेक्सेशन म्हटले जाते.