कोल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेलेले पालिका अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना विशेष बाब म्हणून बोनस देण्याचा निर्णय पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी घेतला आहे.

प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांना निम्म्या महिन्याचे, तर कर्मचारी, कामगारांना एक महिन्याचे वेतन बोनसपोटी देण्यात येणार आहेत. मात्र पूरग्रस्त भागात दोन आठवडे काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार या बोनससाठी पात्र ठरणार आहेत.

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांची मोठी फौजही तेथे रवाना करण्यात आली होती. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० वैद्यकीय अधिकारी, रुग्णसेवक, कीटकनाशक विभागातील १० अधिकारी, कामगार, मलनि:सारण प्रचालन खात्यातील पाच अधिकारी, नऊ कामगार, अग्निशमन दलातील चार अधिकारी आणि १६ कर्मचारी, तर घनकचरा व्यवस्थापन विभागातील १२ अधिकारी आणि तब्बल ४२२ सफाई कामगारांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्त भागांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पालिकेने अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत औषध, कीटकनाशकांचा मोठा साठाही तेथे पाठविला होता.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत करून पूरग्रस्त भागात साफसफाई केली असून साथीचा आजार पसरू नये यासाठी वैद्यकीय पथकाने मोलाचे कार्य केले आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे बंद पडलेले पाण्याचे पंप कार्यान्वित करण्याचे काम पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.

अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना बोनस देण्याचा निर्णय प्रवीणसिंह परदेशी यांनी घेतला आहे. श्रेणी एक आणि दोनमधील अधिकाऱ्यांना निम्म्या महिन्याचे, तर श्रेणी तीन आणि चारमधील कर्मचारी, सफाई कामगारांना एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र पूरग्रस्त भागात दोन आठवडे काम करणारे या बोनससाठी पात्र ठरणार आहेत.

पूरग्रस्त गाव दत्तक घेण्याचे खासदारांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार खासदारांनी एक गाव दत्तक घ्यावे अशी योजना आहे. महाराष्ट्रातील सध्याची पूरस्थिती लक्षात घेता राज्यातील खासदारांनी आपल्या मतदारासंघातील एका गावाव्यतिरिक्त पूरग्रस्त भागातील एक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. खासदार शिंदे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.