मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली, मात्र आता मालमत्ता कराअंतर्गत येणाऱ्या १० करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार असून, इतर ९ कर मात्र भरावे लागणार आहे. त्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत महापालिकेच्या तिजोरीची लूट करून सत्ताधीशांच्या धनदांडग्यावर सवलतीचा पाऊस केला जात असल्याचा आरोप केला आहे. “मुंबई महापालिकेच्या 2020-21च्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर.. 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 25% उत्पन्न जमा! वा, रे वा सत्ताधारी… श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणली. हीच का ती तुमची, करुन दाखवलेली कामगिरी!!,” असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

“बिल्डरांना प्रीमियममध्ये 50% सूट, कंत्राटदारांना सुरक्षा/ अनामत रक्कम, कामगिरी हमीत सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात 50% सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी 100% सूट…ताजला सूट… सत्ताधीशांचा धनदांडग्यांवर सवलतीचा पाऊस अन् महापालिकेच्या तिजोरीची लूट! सामान्य मुंबईकरांना 2015 ते 2020 पर्यंत मालमत्ता करातून वगळण्यात आले. मात्र आता सर्व 500 चौ. फु.पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घर मालकांना मालमत्ता कराच्या दहापैकी नऊ कर हे थकबाकीसह भरावे लागणार! मदत म्हणून काही दिले तर नाहीच, उलट सामान्य मुंबईकरांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरु,” असं टीकास्त्र शेलार यांनी डागलं आहे.

आणखी वाचा- “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

आणखी वाचा- “अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!”

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.