News Flash

नाले अजूनही गाळातच

चार दिवसांपूर्वीच ९२ टक्के नालेसफाईचा दावा प्रशासनाने केला असला तरी शहरातील निम्म्याहून अधिक नाल्यांमधील गाळ अजूनही सफाईच्या प्रतीक्षेत आहे.

| June 1, 2015 03:02 am

चार दिवसांपूर्वीच ९२ टक्के नालेसफाईचा दावा प्रशासनाने केला असला तरी शहरातील निम्म्याहून अधिक नाल्यांमधील गाळ अजूनही सफाईच्या प्रतीक्षेत आहे.
झोपडपट्टय़ांनी दोन्ही बाजूने अडवलेला नाला, सतत टाकला जाणारा कचरा, कारखान्यातून येणारे सांडपाणी आणि कंत्राटदारांची बेफिकिरी यामुळे गाळाने भरलेल्या नालेच सर्वत्र दिसत असून वेधशाळेचे अंदाज चुकवून पाऊस बरसला तर मुंबईकरांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागेल.
शहरातील सव्वातीन लाख मीटर लांबीचे लहान-मोठे नाले असून त्यातील गाळ काढण्याचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असते. २७ मेपर्यंत यातील तीन लाख मीटर लांबीचे नाले साफ झाले असून त्यातील ३ लाख २३ हजार टन म्हणजे अपेक्षित गाळाच्या ९३ टक्के गाळ काढण्याचा दावा पालिकेने केला आहे.
या नाल्यातील सफाई पालिकेतील कागदोपत्री पूर्ण झाली असली तरी शहरातील अनेक नाले सफाईच्या प्रतीक्षेत आहेत. विमानतळाखालून वाहणाऱ्या एकमेव नाल्याचा अपवाद वगळता मालवणी येथील नाला, मोगरा नाला, वांद्रे पूर्व येथील चमडा नाला आणि पूर्व उपनगरातील झोपडपट्टय़ांमधून वाहणारे बहुतांश नाल्यांमधील कचरा उचलला गेलेला नाही. आमच्याकडील एकाही नाल्यातील गाळ काढला गेलेला नाही. दोन्ही बाजूंनी झोपडपट्टी असल्याने जेसीबी यंत्राचा वापर करता येत नाही. पाच -सहा मीटर खोलीच्या नाल्यातून केवळ कामगारांकडून कसा आणि किती गाळ काढणार, असा प्रश्न भांडूपच्या नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी उपस्थित केला.
गोवंडी, देवनार भागातील नाले तर वर्षांनुवर्षे कचऱ्याने भरलेले असतात. या नाल्यांमधून कचरा कधी व कसा काढला जातो याचा कंत्राटदार व प्रशासनाकडे पुरावा नसतो, अशी टिप्पणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी नालेसफाईच्या पाहणीची मोहीम काढून सफाई झालेले नाले दाखवले. मात्र नाल्यातील एवढा गाळ वाहून नेण्यासाठी रोजच्या १६२५ फेऱ्या माराव्या लागतील. मात्र तसे झालेले नाही. नाले अजूनही गाळाने भरलेले आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला.
नाल्यातील गाळ दाखवण्यासाठी विरोधी पक्षाकडून सोमवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 3:02 am

Web Title: bmc preparation for rain
टॅग : Bmc
Next Stories
1 ‘सीसीआयएम’च्या निवडणुकीत वैद्यकीय विकास मंच विजयी
2 ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे अपहृतेची सुटका
3 ‘त्या’ पोलिसांवर भावनिक दबावतंत्र