‘प्रभाग’फेरी  आर मध्य वॉर्ड

अंतर्गत भाग :    संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोराई, कुलवेम गाव, दौलत नगर, चोगले नगर, बोरिवली पूर्व, महावीर नगर, चारकोप खाडीपर्यंतचा भाग

Nagpur Lok Sabha Small increase in voter turnout what does it signal
नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट
South Goa BJP candidate Pallavi Dhempe started campaigning.
Lok Sabha Elections 2024 : गोवा, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणाचे पारडे जड?

महानगरातील जंगलाचे जगातील एकमेव उदाहरण असलेल्या, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार बोरिवलीत उघडते. ही जागा नैसर्गिक संपदेच्या दृष्टीने तर महत्त्वाची आहेच, शिवाय या जंगलाने बौद्ध धर्माचा वारसा सांगणारी शतकानुशतकांपूर्वीची लेणीही जपली. बोरिवली पश्चिमेचा वजिरा हा परिसर व गणपतीच्या मंदिरावरील जुन्या खुणा अजूनही पुसल्या गेलेल्या नाहीत. आता मात्र या दोन्ही परिसराभोवती उंचच उंच इमारतींचा विळखा पडला आहे. त्यातच पुनर्विकासामुळे अधिकाधिक घरे उपलब्ध झाल्याने या उपनगरातील वर्दळ अधिकच वाढली आहे.

दहिसर व कांदिवली येथून येणारे प्रवासी आणि स्थानकाबाहेर असलेला बाजार यामुळे स्थानक परिसरात गर्दी होते. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी तर चालायलाही जागा नसते. बोरिवली स्थानकाच्या पूर्वेचा परिसर त्यामानाने शांत असतो. पश्चिम द्रुतगती मार्गानंतर श्रीकृष्ण संकुलापलीकडे मात्र गरीब वस्ती आहे. राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडेही नागरी सुविधांपासून वंचित आहेत.

भाजपचा प्रभाव कायम

मराठी व गुजराती लोकसंख्येचा भरणा असलेल्या या विभागात सध्या भाजपचे पाच नगरसेवक आहेत. मनसेच्या नावावर दोन जागा आहेत तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेविकांपैकी एकीने शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसचा एक नगरसेवकही या विभागात आहे. या भागात शिवसेनेच्या तिकिटावर कोणीही निवडून आले नसले तरी दरवेळी सेना- भाजपच्या देवाणघेवाणीत हे भाग भाजपच्या वाटेला आले आहेत. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप उमेदवाराला विरोध नको म्हणून सेनेने इथे यथातथाच उमेदवार उभा केल्याची चर्चा होती. साडेसात वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने मते घेतल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला लॉटरी लागली होती. गेल्या निवडणुकीत मनसेचा पत्ता नसल्याने ही जागा पुन्हा भाजपच्या ताब्यात आली. गुजराती लोकसंख्येची मते प्रभाव पाडणारी असली तरी मराठी व उत्तर भारतीय मतदारांचा टक्का अव्हेरता येणार नाही. या वेळी सेना – भाजपची युती झाली नाही तर या भागातील निवडणुका औत्सुक्यपूर्ण ठरतील.

नागरी सुविधांपासून वंचित आदिवासी पाडे

राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारतींमधील साडेपाच लाख नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने नागरी सुविधा मिळवण्याचा मार्ग तीन वर्षांपूर्वी मोकळा करून दिला. मात्र जंगलातील पाडय़ांमध्ये अनेक पिढय़ांपासून राहणाऱ्या आदिवासींना नागरी सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. इथे शौचालयांचा प्रश्न गंभीर आहे. नैसर्गिक विधीसाठी गेल्यावर अनेक आदिवासींवर बिबळ्यांनी हल्ले केले आहेत. या पाडय़ातील लोकांनी कायदेशीर संघर्ष केला तर कदाचित त्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतील. मात्र रोजच्या जगण्याची भ्रांत असताना यासाठी वेगळे प्रयत्न करणे त्यांच्या आवाक्यापलीकडचे आहे, असे वन्यजीवतज्ज्ञ कृष्णा तिवारी यांनी सांगितले.

प्रभागांच्या समस्या कमी दाबाने पाणीपुरवठा

बोरिवली पूर्वेकडे डोंगरावर असलेल्या काजूपाडा, दौलत नगर यांसारख्या गरीब वस्ती तसेच पश्चिम टोकाला असलेल्या गोराईसारख्या मध्यमवर्गीय परिसरात पाणीपुरवठय़ाची समस्या आहे. पाण्याचा दाब पुरेसा नसल्याने गोराईतील नागरिकांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. त्यानंतर पाणीपुरवठय़ात थोडी वाढ झाली असली तरी ती लोकसंख्येच्या मानाने पुरेशी नाही.

रस्त्यावर फेरीवाल्यांची बसकण

बोरिवली पश्चिमेला रस्त्याचा अर्धाअधिक भाग फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. स्थानकासमोरच्या बसस्टॉपसमोरच फेरीवाले बसत असल्याने बस रस्त्याच्या मधोमध उभी राहते. बाजाराच्या रस्त्यावरून जाताना बसचा वेग एवढा मंदावलेला असतो की प्रवाशांना खरेदीही करता येईल. सात आणि आठ क्रमांकाच्या फलाटाबाहेरची स्थिती यापेक्षाही अधिक त्रासदायक आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिका अधूनमधून कार्यवाही करते. मात्र जोपर्यंत ग्राहक आहेत तोपर्यंत हे फेरीवाले राहणार.

वाहतूक कोंडी

फेरीवाल्यांनी अर्धेअधिक रस्ते व्यापल्यावर वाहतूक मंदावणार हे सांगायला तज्ज्ञाची गरज नाही. बोरिवली पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशांनी रिक्षा, खासगी कार यांच्या रांगा लागतात. बोरिवली पश्चिमेकडील रस्ते मात्र रुंद असल्याने तसेच डॉन बॉस्को ते स्थानकापर्यंत रस्त्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाल्याने वजिरा, बाभईच्या जुन्या रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी झाली आहे. मात्र बाभईजवळचा बॉटलनेक तोडण्यात पालिकेला अद्याप यश आलेले नाही.

गोठे, भंगार दुकानांचा विळखा

बोरिवली पश्चिमेकडे गोराई व चारकोप येथे गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. गोठे, भंगारसामान तसेच बांधकामसाहित्याच्या दुकानांनी ही जागा पटकावली आहे. याबाबत चारकोपच्या जागरूक नागरिक व संस्थांनी अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. गोराईला लागून खाडीवर बांधल्या गेलेल्या आंबेडकर नगर, गौतम नगर या वस्त्या तर अध्र्याअधिक गाळात उभ्या आहेत. अनधिकृत असल्या तरी येथील रहिवासीही मतदार आहेत. मात्र इतर नागरी  सुविधांच्या नावाने इथे बोंबाबोंब आहे.

सध्याचे नगरसेवक

* प्रभाग ८ -नगरसेवक – शिवानंद शेट्टी

* प्रभाग ९-नगरसेवक – मनीषा चौधरी

* प्रभाग १०-नगरसेवक -रिद्धी खुरसुंगे

* प्रभाग ११-नगरसेवक -शिल्पा चोगले

* प्रभाग १२-नगरसेवक – आसावरी पाटील

* प्रभाग १३-नगरसेवक – चेतन कदम

* प्रभाग १४-नगरसेवक – बीन दोशी

* प्रभाग १५-नगरसेवक – मोहन मिठबावकर

* प्रभाग १६- नगरसेवक – प्रवीण शाह

* प्रभाग १७- नगरसेवक – संध्या दोशी

 

फेररचनेनंतरची प्रभाग रचना

* प्रभाग ९

लोकसंख्या – ६१,६८४

आरक्षण – मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – एमएचबी कॉलनी, गोराई २, गोराई गाव, गोखले महाविद्यालय

* प्रभाग १०

लोकसंख्या – ६१,११५

आरक्षण – मागासवर्ग

प्रभाग क्षेत्र – गोविंदनगर, योगीनगर, सीकेपी नगर, पै नगर

* प्रभाग ११

लोकसंख्या – ४७, ५५५

आरक्षण – खुला

प्रभाग क्षेत्र – दौलत नगर, श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, काजूपाडा

* प्रभाग १२

लोकसंख्या – ४७,३५२

आरक्षण – खुला

प्रभाग क्षेत्र – राष्ट्रीय उद्यान, कुलूपवाडी, टाटा पॉवर हाउस, मागाठाणे बस आगार

* प्रभाग १३

लोकसंख्या – ४९,५२५

आरक्षण – खुला

प्रभाग क्षेत्र – बोरिवली स्थानक, अकारेश्वर मंदिर, सुकुरवाडी, दत्तपाडा

* प्रभाग १४

लोकसंख्या – ४८,९९६

आरक्षण – महिला सर्वसाधारण प्रभाग क्षेत्र – राजेंद्र नगर, खटाव इस्टेट, संस्कृती संकुल

*  प्रभाग १५

लोकसंख्या – ६१,६८५

आरक्षण – खुला

प्रभाग क्षेत्र – साईबाबा नगर, कोरा केंद्र, सावरकर उद्यान, प्रबोधनकार ठाकरे

नाटय़गृह

* प्रभाग १६

लोकसंख्या – ६३,२४१

आरक्षण –  महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – वजिरा नाका, डॉन बॉस्को विद्यालय, गणेश मंदिर, गोराई १.

* प्रभाग १७

लोकसंख्या – ६०,४८४

आरक्षण – महिला सर्वसाधारण

प्रभाग क्षेत्र – पोईसर बस आगार, सत्या नगर, चिकुवाडी, पुनित नगर

*  प्रभाग १८ 

लोकसंख्या – ६१,०७४

आरक्षण – खुला

प्रभाग क्षेत्र – चारकोप सेक्टर ४,५,९, थीमपार्क उद्यान.

चारकोपमध्ये समाज मंदिरांसाठी जागा ठेवलेली नाही. त्यामुळे येथील सामाजिक संस्थांना बैठका, चर्चा करण्यासाठी, कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जागा नाही. हे सर्व कार्यक्रम खासगी जागेत घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे चारकोप व गोराई वसाहतीदरम्यान गेल्या दहा वर्षांत अतिक्रमणे वाढलेली आहेत. याबाबत पालिकेला वारंवार कळवूनही त्याबाबत दखल घेतली जात नाही. आयुक्त अजोय मेहता यांनी कांदिवलीतील अतिक्रमणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. या बांधकामांकडेही ते लक्ष देतील का?

– राजेश गाडे

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडय़ांना पालिकेकडून नागरी सुविधा मिळू शकतात, मात्र या पाडय़ांना विद्युतसेवा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था पुरवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बांधकामाला वन संरक्षण कायद्यानुसार बंदी आहे. त्यामुळे मत देत असले तरी येथील रहिवाशांना नागरी सेवांपासून वंचित राहावे लागते.

– कृष्णा तिवारी, वन्यजीवतज्ज्ञ.