News Flash

‘बीकेसी’तील जम्बो करोना रुग्णालयाबद्दल पसरवण्यात आलेली माहिती खोटी; BMC नं केला खुलासा

रुग्णालय सायंकाळपासून पुन्हा सुरू करता येऊ शकते

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीकेसी मैदानावर उभारण्यात आलेलं जम्बो कोविड रुग्णालय. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात आणि विशेषतः मुंबईत सुरूवातीच्या काळात करोनाचा प्रसार प्रचंड वेगानं होत असल्याचं लक्षात येताच राज्य सरकारनं रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर एक हजार खाटांची क्षमता असलेलं जम्बो रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयाला चक्रीवादळाचा फटका बसला असल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली. यावर मुंबई महापालिकेनं खुलासा केला आहे.

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत एक हजार बेडची सुविधा असलेलं जम्बो कोविड रुग्णालय वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावर उभारण्यात आलं. या रुग्णालयात काही रुग्णही दाखल झाले होते. मात्र, बुधवारी मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्यानं तेथील रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं होतं. दरम्यान, बुधवारी निसर्ग चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात प्रचंड विध्वंस केला. सुदैवानं मुंबईत हे वादळ आलं नाही. मात्र, या वादळामुळे बीकेसीतील रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली.

याविषयी मुंबई महापालिकेनं ट्विटर हॅण्डलवर रुग्णालयाचे फोटो शेअर करुन खुलासा केला आहे. “निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला मोठा फटका बसल्याचा दावा करत अफवा पसरवल्या जात आहे. त्या खोट्या आहेत. वादळामुळे रुग्णालयाच्या कुंपणाचं फक्त थोडं नुकसान झालं आहे. रुग्णालय व्यवस्थित असून, सायंकाळपासून पुन्हा सुरू करता येऊ शकते,” असं बीएमसीनं म्हटलं आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर बीकेसीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे व्हिडीओ शेअर केले होते. त्याचबरोबर रुग्णालयाचा मोठं नुकसान झालं असून करदात्यांच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी राज्य सरकार व शिवसेनेवर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 11:48 am

Web Title: bmc rejecte all information about bkc covid hospital bmh 90
Next Stories
1 अत्यावश्यक सेवेसाठी मोदी सरकारने मुंबईत लोकल ट्रेन सुरू कराव्यात, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
2 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीकडे लक्ष
3 २५ हजार रहिवाशांचे स्थलांतर
Just Now!
X