मुंबईतील काही भागांमध्ये शनिवारी रात्री दुर्गंधी पसरल्यामुळे अनेक नागरिकांनी सरकारी यंत्रणांकडे फोन करुन चौकशी केल्याची माहिती मुंबई महानगपालिकेने दिली आहे. घाटकोपर, पवई, चेंबुर, विक्रोळीसारख्या भागांमधून अनेक नागरिकांनी गॅसचा वास येत असल्याची तक्रार केल्याचे महापालिकेने ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून नक्की हा वास कशामुळे येत आहे याचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचेही ट्विटरवरुन स्पष्ट करण्यात आलं आहे. गोवंडी पूर्वेतील युएस व्हायटॅमिन कंपनीमध्ये शनिवारी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत असल्याचं  वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलं आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मध्यरात्री एक ट्विट करण्यात आलं. १२ वाजून ३ मिनिटांनी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये, “चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात वायू गॅस गळती सदृश्य वास येत असल्याच्या काही तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. मुंबई अग्निशमन दल या संशयित गळतीचा शोध घेत आहे. योग्य माहिती मिळाल्यानंतर कळविण्यात येईल,” असं म्हटलं होतं.

मात्र या ट्विटच्या आधीच ११ वाजून ५१ मिनिटांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली होती. “चेंबूर आणि चांदीवली भागांमधून आम्हाला काही जणांनी ट्विटवरुन दुर्गंधीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून यासंदर्भात शोध घेतला जात आहे. नियोजनासाठी प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार (एसओपी) काम हाती घेण्यात आले असून काहीही माहिती असल्यास ती कळवली जाईल,” असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

आदित्य ठाकरेंनींच पुढच्या एका ट्विटमध्ये मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं. घरातच थांबा, खिडक्या बंद करुन घ्या असंही आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

त्यानंतर १ वाजून १६ मिनिटांनी मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटवरुन पुन्हा एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये, “कृपया घाबरून जाऊ नये. खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाकडून १३ संयंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. सदर वासामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास कृपया ओला रुमाल किंवा कपडा नाकाभोवती गुंडाळावा,” असं म्हटलं होत.

पावणे तीनच्या सुमार केलेल्या अन्य एका ट्विटमध्ये मुंबई महानगरपालिकेने केलेल्या ट्विटमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये अशल्याचे म्हटलं आहे. “परिस्थिती नियंत्रणात असून आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करण्यात आली आहेत. या वासाचा उगम शोधण्यात येत असून एकूण १७ अग्निशमन संयंत्रे तैनात आहेत. सार्वजनिक उद्घोषणा करण्यासह गरज भासल्यास प्रतिसाद देणारी कृती करण्यास यंत्रणा सज्ज आहे,” असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

या पूर्वी २०१९ मध्ये सप्टेंबर महिन्यात मुंबईत अशाप्रकारे काही भागांमध्ये गॅस गळती झाली होती. शनिवारी रात्री मुंबईमधील आपत्ती व्यवस्थापन केंद्राला १५ ठिकाणांवरुन ३७ जणांनी दुर्गंधी संदर्भात तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनेही त्यांच्याकडे आलेल्या ५० तक्रारींची माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राला दिली.