बॅटरीचे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या टॅबच्या बॅटरीसाठी दर्जा प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले गेल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती टॅब येण्यास किमान महिन्याभराचा विलंब होणार आहे. गेल्या वर्षीही हे टॅब आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत अर्धेअधिक शैक्षणिक वर्ष निघून गेले होते. आता आठवी, नववीसाठीचा प्रोग्राम तयार असला तरी लवकर घसरत असलेल्या बॅटरीचे दर्जा प्रमाणपत्र मिळवण्यात कंपनीला अडचणी येत आहेत. हे प्रमाणपत्र मिळेपर्यंत टॅब वितरित करता येणार नाहीत.

महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी पालिकेने टॅबची कल्पना पुढे आणली होती. २०१४ ची अ‍ॅण्ड्रॉइड प्रणाली असलेल्या आणि वायफाय किंवा थ्रीजीचे कनेक्शन नसलेल्या या टॅबला जोरदार विरोध झाला होता. मात्र त्यानंतर स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर झाला तसेच पुढील वर्षांच्या टॅबखरेदीलाही मंजुरी मिळाली. हे टॅब सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत डिसेंबर उजाडला. हेच टॅब एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांच्या हातून घेण्यात आले. .

या टॅबची बॅटरी लवकर संपत असल्याने ते नीट वापरता येत नसल्याच्या तक्रारी गेल्या वर्षीपासूनच येत होत्या. यंदा या बॅटरीचे दर्जा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी टॅब पुरवठा करणाऱ्या कंपनीला अडथळे येत आहेत. या टॅबच्या बॅटरी चीनहून मागवण्यात येतात. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’ने (बीआयएस) या वर्षी या बॅटरीसाठी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाणपत्र आवश्यक नव्हते. हे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय टॅब वितरित करता येणार नाहीत, अशी माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली. नववीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास अपलोड करून त्यांना मोबाइल दिले जातील. आठवीच्या विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत टॅब देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष हेमांगी वरळीकर म्हणाल्या. टॅबसाठी आठवी, नववीचा अभ्यासक्रम तयार आहे. आठवीनंतर पालिका शाळेतच नववीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद केली जात आहे. जूनअखेर ही माहिती हाती आल्यावर मुलांना टॅब दिले जातील. आठवीच्या मुलांनाही लवकरात लवकर टॅब दिले जातील, असे शिक्षण अधिकारी गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

स्पाइक गार्डलाही विलंब

टॅब शाळेतच संख्या- २२,७९९

किंमत – प्रति ६,८५० रुपये

एकूण – १५ कोटी ६२ लाख रु.

प्रकल्प किंमत – ३२ कोटी रु.

टॅब पुरवणारी कंपनी – टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड