मुंबईत ७५ ठिकाणी केंद्रे सुरू करण्याची महापालिकेची तयारी

मुंबई : करोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांना देता यावी यादृष्टीने मुंबई महापालिका नियोजन करीत आहे. त्यासाठीच दुसऱ्या टप्प्यात ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. ही सर्व केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर दर दिवशी ५० हजार नागरिकांना करोनाची लस देणे शक्य होईल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

लवकरच करोनाची लस उपलब्ध होणार आहे. लसीकरणाची जबाबदारी मुंबई महापालिकेवर टाकण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात परळमधील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीवमधील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रलमधील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेमधील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय या आठ ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच कांजूरमार्ग येथील ‘परिवार’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रादेशिक लस साठवणूक केंद्र उभारण्यात येत आहे. ही सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही आठ केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर दर दिवशी सुमारे १२ हजार नागरिकांना लस देणे पालिकेला शक्य होणार आहे. लस देण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यात आणखी ७५ लसीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेची रुग्णालये, उपनगरांतील पालिकेशी सलग्न १७ रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने येथे ही लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वरळीमधील एनएससीआय, भायखळा येथील रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास, दहिसर येथील दोन, तर मुलुंड येथील एका अशा सहा ठिकाणी जम्बो करोना केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ७५ केंद्राच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या आठवडाअखेरीस ही केंद्रे लसीकरणासाठी सज्ज करण्यात येतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबईमधील लोकसंख्या साधारण एक कोटी ५० लाखांच्या वर पोहोचली आहे. लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. तरच कमी वेळेत अधिक नागरिकांना लस देणे शक्य होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

आठ केंद्रांमध्ये प्रतिदिन १२ हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था आहे. मात्र लोकसंख्या लक्षात घेता लसीकरणाची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आणखी ७५ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे दर दिवशी ५० हजार नागरिकांना लस देता येईल.

सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त,  मुंबई महापालिका