८० टक्क्य़ांहून अधिक परिसर मोकळा

वांद्रे रेल्वेस्थानकाकडून पूर्वेकडे उतरणाऱ्या पुलाच्या दोन्हीकडचा परिसर पहिल्यांदाच मोकळा झाल्याचे मुंबईकरांना दिसत आहे. तानसा जलवाहिनीवर अतिक्रमण करणाऱ्या झोपडय़ांवरील कारवाईसंदर्भात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले असले, तरी त्याआधीच गेल्या तीन दिवसात पालिकेने धडक कारवाई करत येथील ८० टक्क्य़ांहून अधिक परिसर मोकळा केला. गुरुवारी इंदिरानगर वस्तीलाही नोटीस देण्यास आली असून दोन दिवसांनी तिथेही कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंची दहा मीटर परिसरातील अतिक्रमणे डिसेंबरअखेपर्यंत हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेने  कारवाई सुरू केली असली तरी वांद्रे, कुर्ला व वडाळा परिसरातील बांधकामे पाडण्याचे काम कूर्मगतीने सुरू होते. गेल्या आठवडय़ात बुधवारी नोटीस दिल्यानंतर गुरुवारी पालिकेने कारवाई सुरू केली. कारवाई थांबवण्यासाठी गरीबनगरमध्ये आग लावण्यात आली. त्यात सिलेंडर स्फोट झाल्याने आग भडकली व हार्बर मार्गही अर्धा तास बंद करण्याची वेळ आली. आगीमुळे अतिक्रमणांवरील कारवाई तात्पुरती थांबवावी लागली असली तरी पालिकेने सोमवारपासून कारवाई सुरू केली. या कारवाईत वांद्रे स्थानकाला लागून असलेल्या झोपडय़ा हटवण्यात आल्या असून वांद्रे स्थानकाबाहेरचा परिसर गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच मोकळा झाला आहे. जलवाहिन्यांच्या बाजूला तब्बल १५,७८९ झोपडय़ा होत्या. या झोपडय़ा चार टप्प्यात हटवण्याची पालिकेची योजना होती. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील माटुंगा, भांडुप, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर या परिसरातील बहुतांश भागातील झोपडय़ा हटवण्यात आल्या आहेत.

इंदिरानगरला नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गरीबनगरवरील कारवाई थांबवावी लागली असली, तरी गुरुवारी इंदिरानगर येथील जलवाहिनीवरील अतिक्रमित झोपडय़ांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. इंदिरानगरमधील १५३ पात्र झोपडीधारकांना माहुल येथे घरे देण्यात येणार असून त्यासंबंधी शुक्रवारी संबंधितांना पालिकेकडून ताबापत्र मिळण्याची शक्यता आहे.

सांताक्रूझ- वांद्रे परिसरातही कारवाई

सांताक्रूझ ते वांद्रे पश्चिम परिसरातील मिनी पंजाब, पॉल रेस्टॉरंट, बॉम्बे बार्बेक्यू आदी मोठय़ा उपहारगृहांच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने गुरुवारी कारवाई केली. वांद्रे पश्चिम परिसरातील आरक्षित भूखंडावरील ३५ आणि सांताक्रुझ परिसरातील ६५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

न्यायालयाचे ‘जैसे थे’ आदेश

वांद्रे रेल्वे स्थानकाकडून पूर्वेकडे उतरणाऱ्या पुलाच्या दोन्हीकडच्या परिसरांत अतिक्रमण करून उभ्या राहिलेल्या झोपडय़ांवरील पालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात झोपडीधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयानेही कारवाईबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे तसेच कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश गुरुवारी पालिकेला दिले. अतिक्रमण कारवाईच्या वेळी गरीबनगरमधील आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या झोपडीधारकांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश असून त्यांच्या पुनर्वसन करण्याच्या मागणीबाबतही उत्तर दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.