अपघातग्रस्त आणि आणीबाणीच्या काळात रुग्णांच्या मदतीसाठी राज्य सरकारने १०८ क्रमांकाद्वारे उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे कारण पुढे करीत पालिकेने ‘दुचाकी रुग्णवाहिका’ सुरू करण्याबाबत नकारघंटा वाजविली आहे. त्याचबरोबर मुंबईतील लोकसंख्येची घनता आणि वाहतूक कोंडीचे कारण पुढे करीत ‘दुचाकी रुग्णवाहिके’ची नगरसेवकांनी केलेली मागणी धुडकावून लावली आहे.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात. आजारी रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्याची आवश्यकता असते. परंतु मुंबईत लोकसंख्येबरोबर वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकतात. वाहतूक कोंडीमुळे काही वेळा रुग्णवाहिका विलंबाने रुग्णालयात पोहोचते आणि अपघातग्रस्त वा रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. या वाहतूक कोंडीमधून रुग्णांना झटपट रुग्णालयांमध्ये पोहोचविता यावे यासाठी पालिकेने ‘दुचाकी रुग्णवाहिका’ सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका सभागृहात केली होती. रुग्णांच्या दृष्टीने ही चांगली सेवा उपलब्ध होऊ शकेल, असे मत व्यक्त करीत सर्वच नगरसेवकांनी या ठरावाच्या सूचनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही ठरावाची सूचना मंजूर करून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविली होती.
पालिका आयुक्तांनी याबाबत आपला अभिप्राय सादर केला असून मुंबईमध्ये ‘दुचाकी रुग्णवाहिका’ सुरू करता येणार नाही, असे त्यात स्पष्ट केले आहे. मुंबईमध्ये प्रचंड लोकसंख्या असून दिवसभरात आसपासच्या परिसरातून कामकाजाच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर माणसे येत असतात. त्यामुळे मुंबईतील लोकसंख्येची घनता प्रचंड असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर दुर्घटनाग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी वैद्यकीय सेवा पुरविणारी यंत्रणा सक्रिय होते आणि अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्ण इत्यादींना प्रथमोपचार देऊन त्यांना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात नेण्यात येते. अशा व्यक्ती चालण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत झोपवून रुग्णालयात न्यावे लागते. राज्य सरकारने संपूर्ण मुंबईमध्ये १०८ क्रमांकाद्वारे रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. या सुविधेद्वारे मुंबईत अपघातग्रस्तांना व इतर आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होते. त्यामुळे ‘दुचाकी रुग्णवाहिका’ ही संकल्पना मुंबईत व्यवहार्य ठरणार नाही, असे या अभिप्रायात स्पष्ट करीत ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे