दादर, माहीममध्ये वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : दादर आणि माहीम परिसरातील करोनाबाधितांच्या आणि मृत्यूंच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेत आता धारावीच्या धर्तीवर दादर, माहीममधील खासगी डॉक्टर, नर्सिग होमची मदत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधितांबरोबर चर्चा सुरू असून लवकरच खासगी डॉक्टरांची फौज पालिकेच्या मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

धारावीत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पालिके ने येथे खासगी डॉक्टर आणि पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके स्थापन करून घरोघरी जाऊन रहिवाशांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली. त्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय सेवेवरील ताण कमी झाला आणि करोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कातील संशयितांना वेळीच विलगीकरणात हलविण्यात आले. त्यामुळे धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात आली.

गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाचा भाग असलेल्या दादर, माहीम परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आजघडीला दादरमध्ये ४६६, तर माहीममध्ये ४९३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे पालिकेने धारावीच्या धर्तीवर दादर आणि माहीम परिसरातही खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘जी-उत्तर’ विभागाकडून खासगी डॉक्टरांशी संपर्क साधण्यात येत आहे.

धारावीप्रमाणेच दादर, माहीम परिसरातील रहिवाशांची मोठय़ा प्रमाणावर तपासणी करण्यात आली. करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील संशयितांची तात्काळ विलगीकरणात विलगीकरणात रवानगी करण्यात आली. यामुळे दादर, माहीममध्ये फायदा होऊ लागला आहे. आता येथील खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दादरमधील १०५ डॉक्टर आणि २४ नर्सिग होम, तर माहीममधील ७५ डॉक्टर आणि २३ नर्सिग होमबरोबर या संदर्भात चर्चा सुरू आहे. डॉक्टर आणि नर्सिग होमकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

१६३ पथके कार्यरत

‘जी – उत्तर’ विभागातील धारावी, दादर आणि माहीम परिसरांत पालिकेची नऊ आरोग्य केंद्रे आहेत. इथली झोपडपट्टी आणि इमारतींमधील घरांची संख्या अनुक्रमे ९२,७८५ व २७,६८१ इतकी आहे. एकूण १,२०,४६६ घरांमधील ६,०२,३२८ रहिवाशांच्या तपासणीसाठी पालिकेने १६३ पथके कार्यरत केली आहेत. या पथकांमध्ये आरोग्य स्वयंसेविका आणि दोन अन्य स्वयंसेवकांचा समावेश आहे.

नगरसेवक, समाजसेवकांची मदत घेणार

दादर, माहीममधील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि समाजसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. करोनाविषयी जनजागृतीसाठी या सर्वाची मदत घेण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीनेही संबंधितांबरोबर चर्चा सुरू आहे.

करोनाबाधितांची स्थिती

विभाग         एकूण करोनाबाधित      करोनामुक्त    सक्रिय रुग्ण

दादर                      ३०५८                  २४९०                   ४६६

धारावी                   २९४५                  २५३०                  १४४

माहीम                    २७८२                 २१९२                    ४९३

एकूण                      ८७८५                ७२१२                   ११०३

 

धारावीमध्ये करोनासंसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत मोलाची ठरली. त्यामुळे दादर, माहीममध्ये करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील खासगी डॉक्टर, नर्सिग होमची मदत घेण्यात येणार असून सध्या त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे.

किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’