नाना चौक, ग्रँट रोड, मलबार हिल भागांत महापालिका प्रशासनाची कारवाई

मुंबई : मुखपट्टय़ा न लावताच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. दंडाची रक्कम २०० रुपये केल्यानंतरही दंड न भरणाऱ्या आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांना न जुमानणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रँट रोड, नाना चौक, मलबार हिल परिसरांत डी. विभागाने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

करोनाचा संसर्ग नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने मुखपट्टी लावण्याचा नियम राज्य सरकारने अनिवार्य केला आहे. मात्र तरीही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी विनामुखपट्टी वावरत असतात. मुंबईत सप्टेंबर महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मुखपट्टय़ा न लावताच फिरणाऱ्यांविरोधात सर्वच विभागांनी आपापल्या पातळीवर कारवाई कडक केली आहे. मुखपट्टी न लावणाऱ्यांकडून पूर्वी जो १००० रुपये दंड वसूल केला जात असे, तो आता पालिकेने २०० रुपयांपर्यंत आणला आहे. पालिकेच्या घन कचरा विभागातर्फे हा दंड वसूल केला जातो. मात्र तरीही अनेक लोक मुखपट्टीही लावत नाही आणि दंडही भरत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या डी. विभाग कार्यालयाने आता पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

मलबार हिल, नाना चौक, ताडदेव, ग्रँट रोड, लॅमिंग्टन रोड यांचा भाग असलेल्या डी. विभागात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रुग्णवाढीत सध्या हा भाग पहिल्या दहा विभागांमध्ये आहे. विशेषत: उच्चभ्रू इमारतींमध्ये रुग्ण आढळत आहेत. वारंवार इमारती टाळेबंद करूनही पुन्हा रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विभागाने मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांविरोधातील मोहीम तीव्र केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुखपट्टी न लावलेल्यांना पालिका कर्मचाऱ्यांनी हटकले, तर काही जण खिशातून मुखपट्टी काढून लावतात. मात्र एखाद्याकडे मुखपट्टीही नसते. ते दंडही भरत नाहीत आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. त्यामुळे पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याने काही पोलीस हवालदारही मदतीसाठी दिले आहेत. आमचे पथक पाहणीसाठी बाहेर पडते, तेव्हा त्यात पोलीस दिसले की लोकांना गांभीर्य कळते. ते निमूट दंड भरतात किंवा पुढल्या वेळेस खबरदारी तरी घेतात, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अनेक दुकानदार, भाजीवाले मुखपट्टी लावत नाहीत. ते जर बाधित असतील तर किती जणांना त्यांच्यापासून संसर्ग होईल. आता तर दुकानदार, फेरीवाले व भाजीवाले यांच्याही चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, डी. विभाग

डी. विभागात करोनाबाधित

७५४६              एकूण बाधित

५८११             करोनामुक्त

२६९                मृत्यू

१४६६              उपचाराधीन रुग्ण

१.६३ टक्के      रुग्णवाढीचा दर

४३ दिवस         रुग्णदुपटीचा कालावधी