तेरा वर्ष सलमान खानच्या डोक्यावर टांगत्या तलवारीप्रमाणे असलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातून अखेर त्याची सुटका झाल्याबद्दल बॉलिवूडजनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘भाई’जानच्या बॉलीवूडमधील मित्रपरिवाराने गुरुवारी उच्च न्यायालयाने ‘हिट अँड रन’ प्रकरणात सलमान खानला निर्दोष मुक्त केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सलमानसाठी हा निर्णय फार महत्वाचा होता, असे भांडारकर यांनी म्हटले आहे. तर सलमानबरोबर ‘रेडी’, ‘नो एंट्री’ सारखे चित्रपट केलेल्या निर्माते अनीस बाज्मी यांनीही सलमानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हे प्रकरण संपायला खूप वेळ लागला. न्यायालयानेही अंतिम निकाल देताना अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. कायद्याच्या भाषेत किती गोष्टी योग्य किती अयोग्य याची जाण नाही. मात्र, न्यायापेक्षा कोणीही मोठे नाही, असे म्हणत अनीस बाज्मी यांनी सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर ‘हम आपके है कौन’ पासून आत्ताच्या ‘प्रेम रतन धन पायो’पर्यंत सलमानबरोबर कित्येक चित्रपटांमधून एकत्र काम केलेल्या अनुपम खेर यांनीही आपल्याला सलमानबद्दल आनंद वाटत असल्याचे सांगितले.अभिनेत्री हेमामालिनी यांनी तर या निर्णयाचे स्वागत करतानाच आतातरी सलमानने विवाह करून स्थिरस्थावर व्हावे, अशी इच्छा जाहीर केली आहे. निर्माता मुकेश भट्ट यांनी सलमानबद्दल आनंदाची भावना व्यक्त करतानाच आपल्या देशात न्यायाची संकल्पना अजूनही स्पष्ट नाही, अशी सावध भूमिका घेतली आहे. सलमानची एकेकाळची नायिका माधुरी दीक्षित हिने कोणाच्याही आयुष्यात चांगले घडत असेल तर आपल्याला नेहमीच आनंद होतो, असे स्पष्ट करत सलमानबद्दलही आनंद झाला असल्याचे म्हटले आहे. सुभाष घई यांनी चांगल्या व्यक्तिबरोबर चांगलेच घडते, असे म्हणत सलमानच्या डोक्यावरची तेरा वर्षांपासूनची टांगती तलवार दूर करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.