अभिनेत्री पायल घोष आणि रिचा चड्ढा यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने परस्पर सामंजस्याने हा वाद सोडविला आहे. काही दिवसांपूर्वी पायल घोषनं प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.  यावेळी तिने रिचाच्या नावाचादेखील उल्लेख केला होता. त्यामुळे रिचाने पायलविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. तसंच तिने १ कोटी १० लाख रुपयांचा दावा केला होता. मात्र, आता समन्वयानं हा वाद सोडवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी पायलने एका व्हिडीओच्या माध्यमातून अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते. परिणामी संतापलेल्या रिचाने पायलविरोधात तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा दावा ठोकला होता. परंतु या प्रकरणातून पायलने आता माघार घेतली. तसंच रिचाची बिनशर्त माफी मागण्यासही तयार असल्याचं म्हटलं होतं.

रिचा आणि पायल यांना हा वाद मिटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतर आज दोघींनीही हे प्रकरण परस्पर मिटविण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यानुसार, न्यायलयानेही हे प्रकरण निकाली काढलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या न्यायलयाच्या सुनावणीमध्ये पायलने माघार घेतली होती. “मी रिचाची बिनशर्त माफी मागायला तयार आहे. कुठल्याही हेतूपरस्पर तिचं नाव मी घेतलं नव्हतं. माझ्याकडून चूक झाली. मी तिची खूप मोठी फॅन आहे. मी बोलताना थोडं भान ठेवायला हवं होतं. मी माझं विधान मागे घेत आहे. कुठल्याही महिलेला बदनाम करणं हा माझा उद्देश नव्हता,” असं पायल म्हणाली होती.