उच्च न्यायालयाची विचारणा

मुंबई : व्हिडीओकॉन-आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेली कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट नकार दिला.

तातडीने सुनावणी घेण्याची गरज काय, अशी विचारणा करत विशेष न्यायालयाला आरोपनिश्चिती करू द्या. केवळ विशेष न्यायालयाकडून आरोपनिश्चिती केली जाईल म्हणून ही याचिका तातडीने ऐकायची का, अन्य प्रकरणातही असेच होते, असे म्हणत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी कोचर यांच्या याचिके वर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी फे टाळली.

ईडीने दाखल केलेले आरोपपत्र आणि तपासातून पुढे आलेल्या पुराव्यांच्या आधारे विशेष न्यायालयाने सुरू केलेल्या कारवाईला कोचर यांनी आव्हान दिले. ईडीने जप्त केलेली मालमत्ता हा गुन्ह्य़ाचा भाग नसल्याचे यंत्रणेने २०२० मध्ये स्पष्ट के ले होते. त्यानंतरही ईडीने ही बाब लपवली व न्यायालयाने ती जप्त करण्याच्या बाजूने निर्णय मिळवला. याचाच दाखला देत कोचर यांनी विशेष न्यायालयाने सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष न्यायालयाने हे प्रकरण १ ऑक्टोबरला आरोप निश्चितीसाठी ठेवल्याची माहिती देत याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.