मुंबई : दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रत्येक गोष्टीबाबत अतिसंवेदनशील राहिले तर सगळेच कठीण होऊन बसेल, असा टोलाही न्यायालयाने लगावला. अशा प्रकारच्या आरोपांची पडताळणी करणे आवश्यक आहे. आरोपीने प्रसारित केलेला संदेश खरोखर दोन समुदायांतील भावना दुखावणारा आहे का, असा प्रश्नही न्यायालयाने या वेळी उपस्थित केला.

याचिकाकर्ता राजकुमार छाजेड हे मूळचे जळगाव येथील असून चिपळूण येथे त्यांची गोशाळा आहे.  २५ जून २०२० रोजी काहीजणांनी पैशांच्या वादातून त्यांच्या गोशाळेत घुसून तेथे तोडफोड केली. तेथे गायी तसेच कुत्र्यांनाही मारहाण केली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी याचिकाकर्त्यांने व्हॉट्सअ‍ॅपवरून दोन समुदायांतील तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारित केला, असा दावा करत पोलिसांनी त्यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. याचिकाकर्त्यांने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे.