शिस्तभंगाच्या कारवाईची न्यायालयाची सूचना

मुंबई : कुठल्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी चौकशीसाठी बोलावू नये वा अटक करू नये, हे कायद्याने बंधनकारक असतानाही पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी याची महिला सहकारी कविता मणकीकर हिला सूर्यास्तानंतर अटक करणे सीबीआयला चांगलेच भोवले आहे. सीबीआयच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढतानाच मणकीकर हिची अटक बेकायदा आणि त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी देण्याचे कनिष्ठ न्यायालयाचे आदेश बेकायदा ठरवले. एवढेच नव्हे, तर ५० हजार रुपयांचा खर्चाचे आदेश सीबीआयला देताना संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.

२० फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला अटक केली. सूर्यास्तानंतर महिलेला चौकशीसाठी बोलावण्यात येऊ नये वा अटक करू नये, असा कायदा आहे. त्यानंतरही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कायदा धाब्यावर बसवून आपल्याला अटक केल्याचा आरोप करत मणकीकर हिने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच  सीबीआयने केलेली अटक बेकायदा आणि घटनाबाह्य ठरवण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांनी मणकीकर हिच्या याचिकेवर निकाल देताना तिने केलेला आरोप योग्य ठरवला.

तसेच तिची अटक आणि त्यानुसार तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे कनिष्ठ न्यायालयाचे आदेशही रद्द केले. तिच्या अटकेची गरज असेल तर सीबीआय तिला कायदेशीर पद्धतीने अटक करू शकते, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. मात्र न्यायालयाने मणकीकर हिच्या अटकेवरून सीबीआच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. तसेच सीबीआयला ५० हजार रुपयांच्या खर्चाचे आदेश देताना संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचनाही केली. ही कारवाई केली गेली तरच अशा प्रकारांना चाप वचक बसेल, असेही न्यायालयाने म्हटले.

नागरिकांच्या जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होणार नाही ही सरकारची जबाबदारी असते. त्यामुळेच फौजदारी दंडसंहितेची काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे. या प्रकरणाचा विचार केला तर सीबीआयने नियमांचे उल्लंघन करत मणकीकर हिला अटक केल्याने ती बेकायदा असल्याचे न्यायालयाने म्हटले. मणकीकर हिला ‘मोदी फायर स्टार डायमंड’चा अध्यक्ष विपुल अंबानी याच्यासह आणखी चारजणांसह अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेली ती एकमेव महिला आहे.