एकीकडे उपनगरी प्रवासाच्या तिकीट भाडय़ात वाढ करून प्रवाशांचा रोष ओढवून घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाने दुसरीकडे सहा आणि १२ महिन्यांचा पास देऊन हा रोष काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. १ एप्रिलपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. मासिक, त्रमासिक पासच्या तुलनेत या दोन पासमध्ये मिळणारी सवलत अत्यल्प असल्याने या योजनेला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत रेल्वे प्रशासन साशंक आहे. एक वर्ष या योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना पुढे चालू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
तत्कालीन रेल्वमंत्री दिनेश द्विवेदी यांनी सहा महिन्यांचा आणि वर्षांचा पास सुरू करण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यानुसार सहामाही आणि वार्षिक पास १ एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहे. सहामाही पास मासिक पासाच्या ५.४ पट तर वार्षिक पास १०.८ पट असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वर्गातील प्रथम आणि द्वितीय वर्गासाठी हे पास मिळणार असले तरी ‘इज्जत पास’, विद्यार्थ्यांसाठी असलेले ‘मोफत मासिक पास’ त्याचप्रमाणे विद्यार्थी सवलतीचे मासिक आणि त्रमासिक पास यासाठी ही योजना लागू असणार नाही.
प्रतिसाद मिळणार का?
मात्र या योजननेला प्रवाशांचा कितीसा प्रतिसाद मिळेल याबाबत रेल्वे मंत्रालयच साशंक आहे. वर्षभर नियमित प्रवास करणारे प्रवासीही अनेकदा काही काळासाठी रेल्वे प्रवास टाळतात. त्या काळामध्ये वर्षभराचा पास हा अनाठायी गुंतवणूक ठरू शकतो. तसेच रेल्वेच्या गर्दीमध्ये पास हरवला अथवा पाकीट मारले गेले तर त्याचा कोणताही परतावा मिळणार नसल्याने मोठय़ा रकमेचा पास हवा कशाला, असा प्रवाशांचा सवाल आहे. मासिक पासाच्याच पटीमध्ये सहामाही अथवा वार्षिक पास मिळणार असल्याने विशेष काही सवलत प्रवाशांना मिळणार
नाही.
११ मासिक पासांच्या दरामध्ये १२ महिन्यांचा पास तर पाच महिने आणि १२ दिवसांच्या पासाच्या दरामध्ये सहा महिन्यांचा पास मिळणार आहे. ही सवलत विशेष नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सीएसटी-भायखळा मासिक पास ८५ रुपये असून सहा महिन्यांसाठीच्या पासाचे भाडे ४५९ रुपये होते. तर दोन त्रमासिक पासांचे भाडे ४६० रुपये होते. याचाच अर्थ केवळ एक रुपया बचत होते. सीएसटी-कर्जत मासिक पासाचे भाडे ३५५ रुपये इतके असून सहामाही पासाचे भाडे १९१७ रुपये आहे. दोन त्रमासिक पासाचे भाडे १९५० इतके असून फरक केवळ ३३ रुपयांचा आहे. या छोटय़ा फरकामध्ये सहा महिने पास सांभाळून प्रवास करण्याची जबाबदारी प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने टाकली आहे.