बीचवर फिरायला जाताना समु्द्राच्या पाण्याचा कोणत्याही प्रकारे धोका पत्करु नये, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून किंवा रहिवाशांकडून वारंवार दिल्या जातात. मात्र, तरीही काही अतिउत्साही पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचे नुकसान करुन घेतात. अशीच एक घटना शनिवारी विरारमधील नवापूरच्या समुद्र किनाऱ्यावर घडली. एक तरुण बीचवर आपली नवी कोरी कार राईडसाठी घेऊन गेला आणि कारसह तो भरतीच्या पाण्यात अडकला. ही कार समुद्रांच्या लाटांवर तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

तरुणाने मोठे धाडस करीत आपली नवी कोरी पांढऱ्या रंगाची इर्टीगा कार थेट बीचवर रपेट मारण्यासाठी नेली. मात्र, त्याची कार बीचवरच्या वाळूमध्ये रुतून बसली त्यातच समुद्राला भरती सुरु असल्याने ती कार पाण्यासोबत वाहून जात होती. यावेळी कार चालवणारा तरुण आणि त्याचा मित्र या कारमधून बाहेर पडण्यात कसेबसे यशस्वी झाले. मात्र, काही केल्या त्यांना कार पाण्याबाहेर काढता येईना.

त्यानंतर काही स्थानिक लोक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी कार पाण्याबाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर बोलावला. मात्र, या ट्रॅक्टरलाही कार पाण्याबाहेर काढता येईना. दोन तास सातत्याने प्रयत्न केल्यानंतर त्यांना कार पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही कार ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढल्यानंतरही ती सुरु होत नव्हती. कारच्या इंजिनमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरलाही कार हालवणे शक्य होत नसल्याचे दिसते आहे. उलट कार भरतीच्या पाण्यासोबत लाटांवर मागे-पुढे होत होती. वसई-विरार येथील बीचवर अनेक पर्यटक थ्रीलसाठी कार आणि बाईक राईड करीत असतात. मात्र, योग्य वेळ आणि धोकादायक पद्धतीने या गोष्टी केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते हेच या व्हिडिओतून समोर आले आहे.