महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षात (बसप) उभी फूट पडली असून, पक्षनेतृत्व मायावती यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी- कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाची स्थापना केली आहे. नाशिक येथे जाहीर मेळावा घेऊन बसपमधील बंडखोर नेते डॉ. सुरेश माने यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.
यापुढील काळात बसपकडून भ्रमनिरास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहणार असून मायावती यांच्या नेतृत्वाला आव्हान देत पक्षातील आणखी काही असंतुष्टांना जवळ करण्याचा नव्या गटाचा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्रात नेतृत्वाच्या संघर्षांतून सुरेश माने यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. अनेक पदाधिकारी राजीनामे देऊन पक्षातून बाहेर पडले. माने यांनी अशा असंतुष्टांना बरोबर घेऊन आता नव्या पक्षाची स्थापना केली आहे. आपल्यासोबत माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये व बसपमधील राज्य आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आहेत, असा दावा माने यांनी केला. नव्या पक्षाचे ऑक्टोबरमध्ये नागपूर येथे तीन दिवसांचे अधिवेशन होणार आहे.