मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची खर्चाची बाजू गुरुवारी झालेल्या पालिका सभेत कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. साडे चार महिन्यांनंतर दृक्श्राव्य माध्यमातून झालेल्या या सभेत अभूतपूर्व ‘ऑनलाइन’ गोंधळात हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. विकासनिधीपैकी ७३ टक्के निधी शिवसेनेला देऊन महापौरांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप भाजपने केला.

राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून साडे चार महिन्यांत पालिकेची एकही सभा घेण्यात आली नव्हती. टाळेबंदीपूर्वी अर्थसंकल्पाची उत्पन्नाची बाजू मंजूर करण्यात आली. तर खर्चाची बाजू मंजूर करण्यासाठी पाच महिन्यांनी विरोधकांनी विशेषत: भाजपने केलेल्या आक्रमक मागणीनंतर दृक्श्राव्य माध्यमातून सभा पार पडली. ‘झूम अ‍ॅप’द्वारे पार पडलेल्या पहिल्याच सभेत बहुतेक सर्व नगरसेवकांनी हजेरी लावली. सर्वच नगरसेवकांचे ध्वनिक्षेपक सुरू असल्यामुळे एरवी सभेत असतो, त्यापेक्षा अभूतपूर्व असा गोंधळ होता. या गोंधळातच महापौरांनी विषय पुकारला. त्यातच मध्येच कोणी तरी ‘आम्हाला ऐकूच येत नाही,’ असे सांगत होते. तर कोणी तरी ‘आम्हाला बोलू द्या,’ असे सांगत होते. ‘आपापले माईक बंद करा,’ अशा सूचना कोणी करत होते तर कोणी शेरेबाजी करत होते. या गोंधळातच महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपसूचनांसह अर्थसंकल्प मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. विरोधी पक्षाकडून ‘आम्हाला बोलू द्या’चा रेटा सुरू होता. किमान अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांना बोलण्याची संधी देण्यात आली. पण त्यांचाही आवाज ऐकू येत नव्हता.

महापौरांवर पक्षपातीपणाचा आरोप

अर्थसंकल्पीय निधीचे वाटप करताना महापौरांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. एकूण ७२८ कोटींपैकी ५३५ कोटींचा निधी केवळ शिवसेनेसाठी देण्यात आला आहे. तर शिवसेनेइतकेच संख्याबळ असलेल्या भाजपला मात्र १३ टक्के निधी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्ष अशा तीन पक्षांना मिळून १७ टक्के निधीचे वाटप झाले आहे. त्यामुळे विशेषत: भाजपच्या मतदारसंघातील विकासकामांना कात्री लावण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

कोणाला किती निधी?

पक्ष संख्या-  निधी बळ

शिवसेना ९६ ५३५.९५ कोटी

भाजप  ८२ ९८.६१ कोटी

काँग्रेस  ३१ ५२.१० कोटी

राष्ट्रवादी ९  १८.७० कोटी

समाजवादी  ७  २२.७५ कोटी