आर्थिक चणचणीमुळे छोटय़ा सदनिका बांधण्याकडे कल

मुंबई : नव्या विकास नियंत्रण नियमावलीत व्यावसायिक संकुलांसाठी जादा चटईक्षेत्रफळ देऊ  करण्यात आले असले तरी विकासक सध्या त्याचा लाभ घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आर्थिक चणचणीत असलेल्या विकासकांनी त्याऐवजी निवासी संकुलांवर भर देत छोटी घरे बांधण्याचे ठरविले आहे.

नवी नियमावली १३ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली. विकास आराखडय़ात व्यावसायिक संकुलांसाठी पाच इतके चटईक्षेत्रफळ प्रस्तावीत करण्यात आले होते. प्रत्यक्षात विकास नियमावलीत व्यावसायिक संकुलांसाठी पाच इतके नसले तरी जादा चटईक्षेत्रफळ देण्यात आले आहे. व्यावसायिक संकुलांची निर्मिती वाढून रोजगारांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी शासनाची अपेक्षा आहे. परंतु सध्याची बांधकाम व्यवसायाची स्थिती लक्षात घेता व्यावसायिक बांधकामाऐवजी निवासी संकुल उभारण्यात विकासकांना अधिक रस असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवते. मुंबईत सध्या परवडणारी घरे बांधण्याकडे विकासकांचा कल आहे. अनेक बडय़ा विकासकांनी मोठय़ा घरांऐवजी छोटय़ा वन बीएचके घरांकडे मोर्चा वळवला आहे. ३२३ ते ४०० चौरस फुटांची घरे ५५ ते ९० लाख रुपयांत विकासकांनी उपलब्ध करून दिली आहेत. या घरांची लगेच विक्रीही झाली आहे.

‘नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’चे (नरेडको) राष्ट्रीय कार्याध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांच्या मते, आर्थिक चणचणीत असलेल्या विकासकांना सध्या तात्काळ रोकड उपलब्ध करून देणारी योजना हवी आहे. त्यामुळे व्यावसायिक बांधकाम करून जादा चटईक्षेत्रफळ मिळत असले तरी सध्या विकासकांना तात्काळ पैसे उपलब्ध देणारी निवासी संकुले खुणावत आहेत. त्यामुळे तो व्यावसायिक बांधकामाकडे जास्त लक्ष देत नाही, असे त्यांचे निरीक्षण आहे. व्यावसायिक सदनिकांना आजही मागणी आहे, परंतु त्या तुलनेत छोटय़ा घरांना खूप जास्त मागणी आहे.

‘मोठी घरेही त्यांना परवडणारी हवी’

मोठी घरेही त्यांना परवडणारी हवी आहेत, असे छोटय़ा घरांची संकल्पना डी. एन. नगरसारख्या औद्योगिकवसाहतीत अप्पर जुहू या नावाने राबविणाऱ्या ‘प्लॅटिनम कॉर्प’चे संचालक विशाल रतनघायरा यांनी स्पष्ट केले. व्यावसायिक सदनिकांना चांगला दर मिळत असला तरी सुरुवातीला कंपन्यांकडून लीजवर या मालमत्ता घेतल्या जातात. त्यानंतर या मालमत्तांची खरेदी किंमत मिळते. निवासी घरांची लगेच विक्री करता येते. आर्थिक चणचणीत असलेला बांधकाम व्यवसाय त्यामुळेच निवासी संकुलांची निर्मिती करतो. याकडे ‘अ‍ॅनारॉक’ या रिएल इस्टेटमधील सर्वेक्षण कंपनीच्या सल्लागार सेवा विभागाचे संचालक व प्रमुख आशुतोष लिमये यांनी लक्ष वेधले.