जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार असून या ठिकाणी निर्माण केलेल्या सेवा-सुविधांच्या वापरासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेची (लोकल)भाडेवाढ करण्याचे संके त ‘भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळा’ने (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात आयआरएसडीसी) दिले आहेत.

पुनर्विकासासाठी स्थानक आणि रेल्वे हद्दीतील जमीन खासगी विकासकाकडे ६० वर्षांसाठी भाडेकरारावर देण्यात येणार आहे. पुनर्विकासानंतर स्थानकात निर्माण झालेल्या सुविधांसाठी प्रवाशांना सेवाशुल्क द्यावे लागेल आणि त्याचा समावेश उपनगरीय रेल्वे प्रवासी भाडय़ात केला जाईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचा खर्च १,६४२ कोटी रुपये आहे. येत्या सप्टेंबरपासून निविदापूर्व प्रक्रि येला सुरुवात होत आहे. साधारण तीन वर्षांत हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर सेवाशुल्क लागू के ले जाईल,  असे सोमवारी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी एस. के . लोहिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जागतिक वारसा लाभलेल्या या स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय २००८ मध्ये घेण्यात आला. आता या प्रक्रि येला गती दिली जात असून लवकरच सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वावर पुनर्विकास प्रकल्प राबविला जाईल. त्यामुळे स्थानकात विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी व पर्यटकांकरिता गॅलरी, कॅफेटेरिया, वाहनतळ अशा अनेक सुविधा दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. या सुविधा निर्माण होताच विमान प्रवाशांच्या तिकिटात जसे सेवा शुल्क (युजर्स चार्जेस) समाविष्ट केले जाते, तसेच सेवाशुल्क लोकल तिकिटात समाविष्ट होईल, अशी माहिती लोहिया यांनी दिली.

या सुविधांच्या खर्चापोटी वसुल होणारे सेवाशुल्क खासगी विकासकाकडे जाईल. स्थानकावरील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व अन्य सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारितच राहतील.

अन्य स्थानकांचाही विचार

सीएसएमटीसह एलटीटी, वांद्रे, दादर, अंधेरी, बोरीवली, मुंबई सेन्ट्रल, ठाकु र्ली,कल्याण स्थानकाचाही पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे सेवाशुल्क नेमके कोणत्या स्थानकाच्या पुनर्विकासानंतर आकारावे किंवा कधी आकारावे हा निर्णय रेल्वे मंडळाचा असेल.

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाचा कायापालट

* सीएसएमटी स्थानकाला लागून मागील बाजूस असलेली अ‍ॅनेक्स इमारत पूर्णपणे हटविणार. इमारतीतील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासह अन्य कार्यालये भायखळा येथे नेणार. टॅक्सी तळ हटवून प्रवाशांसाठी मोकळी जागा.

*  हॅरिटेज गॅलरी उभारली जाईल.

* सीएसएमटी स्थानकातील हार्बर एक व दोन क्रमांकाचा फलाट पी. डीमेलो  रोड दिशेला हलविणार. त्या ठिकाणी मध्य रेल्वे मुख्य मार्गाबरोबरच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी जागा.

* फलाट क्रमांक १८ च्या आत प्रवेश केल्यानंतर कॅफेटेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा.

* यार्डाचे नुतनीकरण, स्थानक परिसरात वाहनतळासाठी मोकळी जागा.