पर्यावरणाला घातक प्लास्टर ऑफ पॅरिसला निरोप देण्याकरिता गुजरातेत सध्या मोठय़ा प्रमाणावर पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले जात आहे. गांधीनगरमध्ये मुहूर्तमेढ रोवलेल्या या प्रशिक्षण कार्यशाळा आता गुजरातमधील तालुका पातळीवर पोहोचल्या असून मोठय़ा संख्येने मूर्तिकार घडविले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर भविष्यात गुजरातमधील मूर्तिकारांमुळे आपल्या व्यवसायावर गंडांतर येणार नाही ना, अशी भीती मुंबईतील मूर्तिकारांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
मुंबईत ११,५५४ सार्वजनिक मंडळे आणि १ लाख ९० हजार कुटुंबे मूर्ती आणतात. मात्र, महाराष्ट्रासह मुंबईत शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे.
असे असले तरी शाडूच्या मातीपासून मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांचे स्थान अढळ राहिले आहे. पण आता गुजरातमध्ये सध्या युवकांना दिल्या जाणाऱ्या मूर्तीकला प्रशिक्षणामुळे मुंबईतील पारंपरिक मूर्तिकार धास्तावले आहेत. गुजरातमधील मातीकाम कलाकारी ग्रामीण उद्योग विकास संस्थेने गांधीनगर येथे मूर्ती कला प्रशिक्षणाचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रातील काही मूर्तिकारांना प्रशिक्षण देण्यासाठी तेथे आमंत्रित करण्यात आले होते.
या मूर्तिकारांकडून प्रशिक्षण घेतलेले ६० जण सध्या गुजरातमधील विविध तालुक्यांमधील तरुणांना मूर्तिकलेचे धडे देत आहेत. ‘मूर्तीकाम शिका आणि इतरांना शिकवा’ असा मंत्रच गुजरातमध्ये देण्यात आला आहे.
पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीसाठी लागणारी शाडूची माती गुजरातमधील भावनगर आणि आसपासच्या परिसरातून महाराष्ट्रात आणली जाते. भविष्यात गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणावर मूर्तिकार तयार झाल्यानंतर महाराष्ट्रात शाडूच्या मातीऐवजी थेट पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची आयात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मूर्तीकारांनी म्हटले आहे.

मूर्तिकला व्यवसायाची सध्या गुजरातमध्ये मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे, भविष्यात या व्यवसायाचा अन्यत्र विस्तार करण्यात येईल, असे गुजरातमधील एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. पण भविष्यात गुजरातमधील पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती मुंबईत आल्या तर त्यात नवल वाटायला नको. कारण मुंबई-महाराष्ट्रातील काही मूर्तिकार गणेशमूर्तीच्या साच्यांची तेथे विक्री करीत आहेत.
-श्रीकांत देवधर, प्रसिद्ध मूर्तिकार

सध्या शाडूची माती पूर्वीप्रमाणे मुबलक प्रमाणात मिळत नाही. भविष्यात गुजरातमधील मूर्तीकारांकडून मातीला मागणी वाढली तर मुंबईतील मूर्तिकारांना मातीही मिळणे दुरापास्त होईल.
-प्रदीप मादुस्कर, प्रसिद्ध मूर्तिकार