सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) बोलणाऱ्या प्रवाशाला पोलिसांकडे घेऊन जाणाऱ्या उबर चालकाचा भाजपाकडून सत्कार करण्यात आला आहे. भाजपाकडून चालकाला अलर्ट सिटिजन अवॉर्ड देण्यात आला. सीएए-एनआरसी विरोधात बोलत असल्याने उबर चालकाने प्रवाशाच्या नकळत सांताक्रूझ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे अटकेची मागणी केली. ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी ट्विटर पोस्ट करत सगळा घटनाक्रम सांगितला होता.

भाजपा नेते मंगल प्रभात लोढा यांनी ट्विटरवर चालकाचा सत्कार करतानाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, “रोहित गौर याने सीएएवरुन देशाविरोधात षडयंत्र रचणाऱ्याला पोलिसांच्या हवाली केलं. रोहित गौरला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात बोलावून जनतेच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं. तसंच अलर्ट सिटिजन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं”.

दरम्यान उबरने चालकाविरोधात कारवाई करत त्याचं निलंबन केलं आहे. रोहित गौर याने आपण जे केलं ते योग्य असल्याच्या मतावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. मी एक सजग नागरिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं आहे असं त्याने म्हटलं.

नेमकं काय झालं होतं ?
जयपूरमधील कवी बप्पादित्य सरकार सीएए-एनआरसी विरोधात बोलत असल्याने उबर चालकाने त्याच्या नकळत सांताक्रूझ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे अटकेची मागणी केली. एटीएममधून पैसे काढायचे असल्याचं खोटं सांगत त्याने बप्पादित्य सरकार याला पोलीस ठाण्यात नेलं. तुम्ही लोक आमचा देश नष्ट करायला निघाले असताना आम्ही फक्त पाहत बसायचं का असं ओरडत तो पोलिसांकडे अटकेची मागणी करु लागला.

धक्कादायक! CAA विरोधात बोलणाऱ्या प्रवाशाला उबर चालकाने पोलीस ठाण्यात नेऊन केली अटकेची मागणी

२३ वर्षीय बप्पादित्य सरकार जुहू येथून आपल्या मित्राच्या घरी कुर्ला येथे चालला होता. यावेळी चालकाने आपल्याला एटीएममधून पैसे काढायचे असल्याने थोडा वेळ एका जागी थांबलो तर चालेल का अशी विनंती केली. बप्पादित्य सरकार याने होकार दिला. पण जेव्हा कॅब सांताक्रूझ पोलीस ठाण्याबाहेर थांबली तेव्हा त्याला काहीतरी गडबड सुरु असल्याचं लक्षात आलं.

यानंतर तो पोलिसांना घेऊन आला आणि सांगू लागला की, “तुम्ही याला अटक करा. हा देश जाळण्याबद्दल बोलत होता. माझ्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहे”. पोलिसांनी यानंतर जवळपास दोन तास बप्पादित्य सरकारची चौकशी केली. वकिलाने मध्यस्थी केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. यावेळी जातानाही पोलिसांनी त्याला गळ्यात लाल स्कार्फ घालू नको, तसंच नेहमी हातात डफली घेऊन फिरु नको. सध्या नाजूक वेळ आहे असा सल्ला दिला.