|| निमित्त : शैलजा तिवले

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए)

रुग्णांचा औषधांपासून ते उपचाराचा खर्च उचलण्यासाठी ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’कडून (सीपीएए) चालवल्या जाणाऱ्या रुग्ण दत्तक योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ३०० हून अधिक कर्करुग्ण संस्थेच्या माध्यमातून दत्तक घेतले गेले आहेत. यात दत्तक रुग्णांच्या उपचारांचा व औषधांचा वार्षिक खर्चाचा भार दाते मोठय़ा आनंदाने उचलत आहेत.

कर्करुग्णांच्या सेवेचा वसा गेली ५० वर्षे अविरतपणे चालवणारी ‘सीपीएए’ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. ५०० रुपये आणि एका टंकलेखन यंत्रासह सुरू झालेल्या संस्थेचा आज वटवृक्ष निर्माण झाला आहे. या सावलीत ३० हजारांहून अधिक रुग्णांनी आसरा घेतला आहे. एका लहान मुलीचा कर्करोगाशी सुरू असलेला झगडा, आर्थिक परिस्थिती नसल्याने आई-वडिलांची होणारी ओढाताण संस्थेचे संस्थापक वाय.के.सप्रू यांच्या नजरेस आली. मित्रांच्या मदतीने त्यांनी औषधांसह तिच्या उपचाराची व्यवस्था केली. या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या सप्रू यांनी भविष्यात या आजाराचे धारण होणारे गंभीर स्वरूप आणि समाजाची गरज या दूरदृष्टिकोनातून १९६९ साली संस्थेची स्थापना केली. सप्रू यांच्या घरातून संस्थेचे काम सुरू झाले. त्यानंतर जवळपास २७ वर्षांनंतर संस्थेला महालक्ष्मी येथील आनंदनिकेतन येथे हक्काची जागा प्राप्त झाली. सुरुवातीला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या संस्थेने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या गरजा लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने संस्थेचे जाळे विणले.

आज संस्था अनेक रुग्णांना आर्थिक मदतीसह मानसिक आधारही देत आहे. ७१ वर्षांच्या उषाताई सांगतात, ‘पाच वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले तेव्हा मी शरीराने व मनानेही खचले होते.  २०१४ साली ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाअंतर्गत संस्थेची माहिती समजली. संस्थेशी संपर्क साधल्यापासून मिळालेली इथल्या व्यक्तींची साथ अजूनही कायम आहे.’ ‘आता रडायचे नाही तर शेवटपर्यंत लढायचे असे मनाशी पक्के ठरविले आहे,’ असे उषाताई सांगतात तेव्हा ‘अनंत आमुची धेयासक्ती..’ कुसुमाग्रजांच्या या ओळी आठवतात.

समुपदेशन केंद्र

कर्करोग म्हणजे मृत्यूच्या खाईत ओढून घेऊन जाणारा आजार हा गैरसमज मोडीत काढून त्यांच्यामध्ये आशेचा किरण दाखवण्यासाठी समुपदेशन केंद्राची स्थापना केली. कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णासोबतच नातेवाइकांना मानसिक पाठबळ देण्याची गरज असते. त्यांना या धक्क्य़ातून सावरून उपचारापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शनही संस्थेकडून केले जाते. टाटा मेमोरियलसह नायर, केईएम, लोकमान्य टिळक, वाडिया अशा अनेक रुग्णालयांमध्ये संस्थेच्या माध्यमातून समुपदेश केंद्र चालवले जाते.

रुग्णांची काळजी

शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. अशा रुग्णांना पोषक आहार देण्यासाठी संस्थेची फूड बँक उपलब्ध आहे. दात्यांच्या मदतीने महिन्याचे अन्नधान्यही गरजू रुग्णांना पुरविले जाते. रुग्णांचे नातेवाईक नसल्यास घरी भेटी देऊन त्यांची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते तत्पर असतात. थेट आर्थिक मदत देण्यापेक्षा मोफत चाचण्या, माफक दरामध्ये औषधे, उपचार, दुष्परिणामांचे मार्गदर्शन, संबंधित डॉक्टरांशी संवाद या माध्यमातून संस्थेकडून पाठबळ दिले जाते.

पुनर्वसन केंद्र

कर्करोगातून मुक्त झालेल्या रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. संस्थेच्या आवारातच शिवणकाम, रंगकाम, मेणबत्ती बनवणे, पुस्तक बाईंडिंग, बॉक्स तयार करणे इत्यादी कौशल्ये शिकवली जातात. यामधून पणत्या रंगवणे, मोठय़ा हॉटेलना त्यांच्या नावाच्या प्रिंटिंगचे कपडे पुरवणे, वस्तू पॅकिंग करणे इत्यादी लघुउद्योग उभे राहिले आहेत. ७०० हून अधिक कर्करुग्णांचे पुनर्वसन करण्यात संस्थेला यश आले आहे. कलाकुसर केलेल्या भेटवस्तू वक्रीसही ठेवण्यात आल्या आहेत.

एचपीव्ही लसीकरण

संस्थेच्या माध्यमातून हिरवे बाजार, राळेगणसिद्धी अशा छोटय़ा गावांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून १४ वर्षांखालील मुलींचे एचपीव्ही लसीकरण करण्यात आले आहे. या गावांमध्ये तपासणी करून गरजेनुसार उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुंबईतील काही शाळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जवळपास पाच ते सहा हजार रुपये खर्च असून पुढील पिढी कर्करोगमुक्त राहावी यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

कृत्रिम स्तन (प्रोस्थेसिस)

स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांचे बहुतांश वेळा एक किंवा दोन्ही स्तन काढले जातात. अशा महिलांना कृत्रिम स्तन बाजारात उपलब्ध असले तरी तुलनेने महाग आणि वापरासाठी सोयीस्कर नसतात. तेव्हा महिलांना रोज वापरात येतील असे कापडाचे कृत्रिम स्तन शिवण्याचे केंद्रही संस्थेमध्ये सुरू करण्यात आले आहे.

जनजागृती आणि मोफत तपासण्या

कर्करोगाबाबत योग्य माहिती समाजापर्यंत पोहचविण्यासाठी संस्थेकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. बहुतांश वेळा हा आजार पसरल्यानंतरच याचे निदान होते आणि त्यामुळे उपचारातील गुंतागुंतही वाढते. तेव्हा वेळेत निदान करण्यासाठी मोफत चाचणी शिबिरांवर संस्थेचा भर असतो. महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे वेळेत निदान करण्यासाठी एचपीव्ही चाचणी संस्थेच्या महालक्ष्मी कार्यालयात उपलब्ध केली आहे. तसेच संशयित कर्करुग्णाच्या चाचण्या, कर्करुग्णांनी भविष्यात निरोगी राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, कर्करोगाची पुन्हा बाधा होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय याबाबतचे मार्गदर्शन नायगाव केंद्रामध्ये करण्यात येते.