नालेसफाईच्या कामावर कोटय़वधी रुपयांचा चुराडा करूनही पावसाळ्यात ठाणे तुंबत असल्याने खडबडून जागे झालेल्या लोकप्रतिनिधींनी आता शहरातील नाल्यांची देखभाल खासगी संस्थेमार्फत करावी, अशा स्वरूपाचा ठराव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. मंगळवारी पहाटे झालेल्या पहिल्याच पावसात नाला तुंबून इंदिरानगर येथील १२० घरांमध्ये पाणी शिरले होते. नालेसफाईचे पितळ उघडे पडल्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी अशा ठराव मंजूर केला. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील नालेसफाई केवळ ६४ टक्केच झाल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
महिनाभर उशिराने नालेसफाईची कामे सुरू झाल्याने शहरातील नाल्यांची साफसफाई अद्यापही अपूर्ण आहे. नालेसफाईच्या निविदेस ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही़  त्यामुळे यंदा नालेसफाईच्या कामास उशिरा सुरू झाला, अशी कबुली महापालिका प्रशासनाने दिली.
दरम्यान, इंदिरानगर भागातील घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली़ नालेसफाईवर वर्षांनुवर्षे कोटय़वधी रुपयांचा चुराडा होऊनही दरवर्षी ठाणे शहर तुंबते. एकप्रकारे महापालिकेचे हे अपयश आहे. त्यामुळे नाल्यांची देखभाल, सफाई, दुरुस्ती ही सर्व कामे एका खासगी संस्थेमार्फत प्रायोगिक तत्त्वावर केली जावीत, अशा स्वरूपाचा ठराव आज मंजूर करण्यात आला. यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दोन नाल्यांची निवड केली जावी, असेही या वेळी ठरले.
दरम्यान, येत्या १० जूनपर्यंत शहरातील सर्वच नाल्यांची सफाई पूर्ण करावी, असे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी महापालिकेने घोडबंदर भागातील जागा विद्यापीठास देऊ केली आहे. मात्र, त्या ठिकाणी उपकेंद्र उभारण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. तसेच त्या ठिकाणी अनैतिक धंद्यांचा पेव फुटला असून जागेचा योग्य वापर होत नसल्याने महापालिकेत नाराजीचा सूर आहे. ही जागा परत घ्यावी आणि तिचा सदुपयोग करावा, अशा स्वरूपाचा ठरावही गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला.