प्रसाद रावकर

‘सीएसआर’अंतर्गत उभारलेल्या शौचालयांच्या देखरेखीसाठी ३१ लाखांचा खर्च; जाहिरातीतून उत्पन्न मिळवण्याची क्लृप्ती

बकाल वस्त्यांमधील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल लोकवर्गणीतून करणाऱ्या मुंबई महापालिकेने मरिन ड्राइव्ह आणि गेट वे ऑफ इंडिया येथे उभारलेल्या शौचालयांच्या देखभालीसाठीचा ३१ लाखांहून अधिक खर्च आपल्या तिजोरीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व योजनेतून (सीएसआर) या अत्याधुनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. मात्र, आता या शौचालयांची देखभालही डोईजड होऊ लागल्याने तेथे जाहिराती झळकवून उत्पन्न कमवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मरिन ड्राइव्हचा अथांग सागर आणि मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. तसेच व्यायाम करण्यासाठी दक्षिण मुंबईतील रहिवासी मोठय़ा संख्येने या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी येत असतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक अशी शौचालये उभारण्यात आली. विविध कंपन्यांनी पुढाकार घेऊन सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मरिन ड्राइव्ह येथे अत्याधुनिक शौचालय उभारले. या शौचालयाच्या उभारणीवर तब्बल ९० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या अत्याधुनिक शौचालयाचे उद्घाटन २ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले. त्यापाठोपाठच अन्य काही संस्थांनी पुढाकार घेत खास महिलांसाठी गेट वे ऑफ इंडिया येथे अत्याधुनिक शौचालयाची उभारणी केली. या शौचालयाच्या उभारणीसाठी तब्बल ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

ही दोन्ही शौचालये अस्वच्छ राहिल्यास त्यामुळे पर्यटकांच्या मनात मुंबईची प्रतिमा डागाळू शकते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने या दोन्ही शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्याचा निर्णय घेतला आहे. मरिन ड्राइव्ह येथील शौचालयाची स्वच्छता, देखभाल आणि अन्य सुविधांसाठी वर्षांकाठी तब्बल १६ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथील शौचालयासाठी वर्षांकाठी १४ लाख ७५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही शौचालयांसाठी पालिकेला एकूण ३१ लाख १३ हजार रुपये खर्च येणार आहे.

भविष्यात या खर्चाचा भार हलका व्हावा यासाठी शौचालयांच्या अंतर्गत भागात जाहिराती झळकविण्यास परवानगी देण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. जाहिरातींच्या उत्पन्नातून शौचालयांच्या देशभालीचा खर्च भागविण्यात येणार आहे. जाहिरात झळकविण्यासाठी शौचालयांमध्ये किती जागा उपलब्ध आहे याची चाचपणी सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा मागवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत पालिकेलाच देखभालीसाठी खर्च करावा लागणार आहे.

मरिन ड्राइव्ह आणि गेट वे ऑफ इंडिया येथे मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांचा वावर असतो. त्यामुळे या परिसरामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अत्याधुनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. ही शौचालये विनाशुल्क असून त्यांची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. या शौचालयांतील अंतर्गत भागात जाहिराती झळकवून देखभालीसाठी लागणारा निधी उभारण्याचा विचार आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय