News Flash

सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांना झटका दिल्यानंतर सीबीआय तपासाला वेग; टीम NIA कार्यालयात दाखल

उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या अनिल देशमुख आणि राज्य सरकारला दिलासा मिळाला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावल्या. यामुळे मार्ग मोकळा झालेल्या सीबीआयच्या तपासाला वेग आला आहे.

सीबीआयचे अधिकारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात दाखल झाले होते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांत सचिन वाझेंचाही उल्लेख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआय एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधातील सीबीआयची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

परमबीर सिंह व अनिल देशमुख हे दोघेही राज्य सरकार व प्रशासनामध्ये उच्च पदांवर कार्यरत होते. दोघांनी मतभेद होण्यापूर्वी एकत्र काम केलेले आहे. या प्रकरणातील उच्चपदस्थ आणि झालेले गंभीर आरोप पाहता स्वतंत्र चौकशी पाहिजे, असं मत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केलं. आरोप करणारी व्यक्ती (परमबीर सिंह) राज्य सरकारची शत्रू नव्हे तर प्रशासनाशी हातात हात घालून काम करणारी होती. उच्च न्यायालयाने निर्देश दिले तेव्हा देशमुख मंत्री होते असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 11:04 am

Web Title: cbi officials arrive at nia office for investigation over allegation against anil deshmukh sgy 87
Next Stories
1 रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट आणि ‘एमआरपी’ कमी करा
2 करोनानिर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचे राज्यव्यापी आंदोलन
3 अंबानी धमकी प्रकरणात प्रदीप शर्मा यांची चौकशी
Just Now!
X