कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणालीबरोबरच उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागात आणलेल्या ‘कॅश कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम’ (सीसीओ-एटीव्हीएम) यंत्रांना अजून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच या यंत्रांमधील सदोष सॉफ्टवेअर दुरुस्त करण्यासाठी विनंतीपत्र पाठवूनही सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टमने (क्रीस) त्याबाबत काहीच कारवाई केलेली नाही. परिणामी, मध्य रेल्वेवर आलेली ४८ नवीन यंत्रे पेटीबंद अवस्थेत विविध स्थानकांवर पडून आहेत.
दर दिवशी मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी उपनगरीय रेल्वेमार्गाचा आसरा घेणाऱ्या आणि चरितार्थासाठी या रेल्वेमार्गावर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने ९ ऑक्टोबरपासून नवीन तिकीट प्रणाली सुरू केली. कागदविरहित तिकीट प्रणालीबरोबरच याच दिवशी मध्य रेल्वेने ‘कॅश कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम’ यंत्राचाही समावेश उपनगरीय सेवेत केला. या यंत्रात सुटे पैसे टाकून हव्या त्या स्थानाचे तिकीट काढणे शक्य आहे. त्याशिवाय याच यंत्रावर स्मार्ट कार्डाचा वापर करूनही तिकीट काढता येऊ शकते. स्मार्ट कार्डमध्ये पैसे भरण्याचा पर्यायही या यंत्रावर उपलब्ध आहे.
मात्र, हे यंत्र पाच रुपयाचे जुने नाणे स्वीकारत नसल्याचा दोष काही दिवसांतच समोर आला. तसेच असे नाणे आत टाकल्यास तिकीट न देता नाणेही परत येत नसल्याचेही प्रवाशांना आढळले होते. स्मार्ट कार्डमध्ये पुनर्भरणा करताना अनेकदा यंत्राने रक्कम स्वीकारूनही कार्डमध्ये पैसे भरले गेले नसल्याचे आढळले होते. अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर मध्य रेल्वेने क्रीस या संस्थेला रीतसर पत्र लिहून या समस्येचे निराकरण करण्याची विनंतीही केली होती.
या यंत्रणेतील दोष काढण्यासाठी अद्याप तरी काहीच कारवाई केली गेली नसल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे मुंबई विभागातील एकाही स्थानकावर नव्याने ही यंत्रे लावण्यात आलेली नाही. सध्या मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर मिळून एकूण ४८ यंत्रे पेटीबंद अवस्थेत पोहोचवलेली आहेत. मात्र त्यापैकी एकही यंत्र चालू करण्यात आलेले नाही.