18 January 2019

News Flash

जेनेरिक औषधे स्वतंत्र विक्रीस ठेवा

‘डीसीजीआय’ची औषधविक्रेत्यांना सूचना

प्रतिनिधिक छायाचित्र

‘डीसीजीआय’ची औषधविक्रेत्यांना सूचना

कोणत्या औषधाच्या दुकानांमध्ये जेनेरिक औषधे मिळतात, हे ग्राहकांना आता लगेचच समजणार आहे. औषधाच्या दुकानात जेनेरिक औषधांसाठी स्वतंत्र खण करण्यात यावा आणि हा खण ग्राहकांना दिसेल अशा दर्शनी भागात असावा, अशी सूचना केंद्रीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) विभागाकडून राज्य अन्न व औषध प्रशासनाला करण्यात आली आहे.

जेनरिक औषधांच्या प्रसार आणि प्रचारासाठी केंद्र सरकारकडून ३००० जेनेरिक औषधालये सुरू करण्यात आली. भारतीय वैद्यक परिषदेनेही एप्रिल २०१७ मध्ये डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून द्यावीत, असे फर्मान काढले होते. त्यानंतर आता ‘डीसीजीआय’नेही जेनेरिक औषधांच्या विक्रीबाबतही सूचना केल्या आहेत. जेनेरिक औषधे दुकानामध्ये उपलब्ध असल्याची माहिती ग्राहकांना मिळावी, यासाठी दुकानांच्या दर्शनी भागात जेनेरिक औषधे वेगळ्या खणामध्ये ठेवण्यात यावीत. इतर औषधांसोबत विक्रीस ठेवू नये, अशा आशयाचे परिपत्रक ‘डीसीजीआय’ने मंगळवारी जाहीर केले. औषध सल्लागार समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळ यांच्यासोबतच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही या परिपत्रकामध्ये नमूद केले आहे. केंद्राचे परिपत्रक राज्य अन्न व औषध प्रशासनाकडे आले आहे. लवकरच राज्यातील औषधविक्रेत्यांसाठी प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात येतील.

केवळ स्वतंत्र खण पुरेसा नाही

केंद्र सरकारच्या या सूचना योग्य असून यामुळे ग्राहकांना जेनेरिक औषधांच्या शोधासाठी भटकावे लागणार नाही. औषधविक्रेत्यांनी असा वेगळा खण केला तरी डॉक्टर जोपर्यंत जेनेरिक औषधे लिहीत नाहीत, तोपर्यंत ग्राहकही ती घेण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे केवळ वेगळा खण निर्माण करणे पुरेसे नाही. डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांऐवजी स्वस्त दरातील जेनेरिक औषधे देण्याचे अधिकार फार्मासिस्टला देणे गरजेचे आहे, असे मत राज्य रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी व्यक्त केले.

First Published on June 14, 2018 1:32 am

Web Title: central drugs standard control organization generic medicine