कळवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर बुधवारी रात्री रेल्वे रुळाला तडा गेला आणि  मुलुंड ते कळवादरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पेंटोग्राफ, सिग्नल यंत्रणेत बिघाड, इंजिन घसरणे या ना त्या कारणाने गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत आहे.

रात्री ९-४० च्या सुमारास कळवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेला. या प्रकारामुळे ठाणे ते बदलापूर ही ९ वाजून ३२ मिनिटांनी सुटणारी उपनगरी गाडी रद्द करण्यात आली. गाडय़ांच्या गोंधळामुळे ठाणे ते मुंब्रा स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

 

मुंबईत रेल्वेवरील गेल्या १५ दिवसांमधील बिघाड

  • १३ जुलै : ओव्हरहेड वायरमध्ये कुत्रा अडकल्याने रेल्वे बिघाड
  • १२ जुलै : कोपर येथे कसारा लोकलमध्ये पेण्टोग्राफमध्ये शॉर्ट सर्किट
  • ११ जुलै : वांगणी आणि शेलू या स्थानकांदरम्यान इंजिनमध्ये बिघाड
  • १० जुलै : पारसिक बोगद्याजवळ गाडीचे दोन डबे वेगळे झाले
  • ०७ जुलै : सीएसटी यार्डमध्ये उद्यान एक्सप्रेसचे इंजिन रूळांवरून घसरले
  • ०४ जुलै : डहाणू रोड येथे मालगाडीचे डबे घसरल्याने पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा विस्कळीत
  • ०२ जुलै : पश्चिम रेल्वेवर माहीम येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड
  • ०२ जुलै : मध्य रेल्वेवर लोकलमध्ये बिघाड झाल्याने दादर येथे लोकल अडकली
  • ०१ जुलै : माहीम येथे हार्बर मार्गावर पाणी तुंबल्याने वांद्रे-अंधेरी ते सीएसटी वाहतूक विस्कळीत
  • २८ जून : पालघरजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत