गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात प्रीमियम दरांत वातानुकूलित डबलडेकर गाडी चालवून प्रवाशांचा खिसा कापणारी मध्य रेल्वे आता याच गाडीमुळे प्रवाशांची झोप उडवण्याच्या तयारीत आहे. सध्या देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये असलेली ही गाडी कोकणासाठी नियमित करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. मात्र या गाडीसाठी मध्य रेल्वे अत्यंत अगोचर वेळेचा विचार करत असून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी रात्री दीड वाजता सोडण्याबाबत विचार सुरू आहे.
गणेशोत्सवात ही गाडी प्रीमियम दरात चालवण्याचा आत्मघातकी निर्णय घेतल्यानंतर मध्य रेल्वेने ही गाडी दिवाळीत चालवून दिवाळेही काढून घेतले. त्यानंतर ऐन नाताळ आणि नवीन वर्षांच्या मुहूर्तावर ही गाडी देखभाल दुरुस्तीसाठी पाठवून देण्यात आली. तेव्हापासून ही गाडी कारशेडमध्येच उभी आहे. मध्यंतरी ही गाडी दक्षिण रेल्वेकडे जाणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
मात्र मध्य रेल्वेने या बातम्या फेटाळून लावली. ही गाडी कोकणसाठीच चालवायची आहे. मात्र त्यासाठी सध्याच्या वेळापत्रकात उपलब्ध असलेल्या वेळेनुसार ही गाडी रात्री दीड वाजता सोडता येईल. मात्र एवढय़ा रात्री ही गाडी चालवल्यास प्रवासी प्रतिसाद कसा असेल, याबाबत शंका आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक राजीव दत्त शर्मा यांनी सांगितले.
मध्य रेल्वेने अशा अडनिडय़ा वेळी ही गाडी चालवल्यास प्रवाशांच्या प्रतिसादाबद्दल नक्कीच शंका आहे. मात्र ही गाडी कोकणात चालवण्याच्या बाबतीत मध्य रेल्वे पहिल्यापासूनच प्रचंड उदासीन आहे. रेल्वेला ही गाडी कोकणात खरेच चालवायची आहे का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रेल्वेने यापुढे ही गाडी कोकणात चालवताना साधारण दरांत आणि योग्य वेळेत चालवावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली आहे.