डेक्कन क्वीन, इंद्रायणीचाही समावेश ; ‘प्रगती’सारखी अंतर्गत सजावट

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्स्प्रेसच्या डब्यांमधील अंतर्गत सजावटीतील बदल प्रवाशांच्या पसंतीस पडल्यानंतर आणखी पाच एक्स्प्रेस गाडीच्या सजावटीतही अशाच प्रकारे बदल केले जाणार आहेत. सीएसएमटी ते पुणे डेक्कन क्वीन, तसेच याच मार्गावरील इंद्रायणी एक्स्प्रेस नागपूर, अमरावती, सोलापूर मार्गावरील गाडय़ांचा यात समावेश आहे. मार्च २०१९ पर्यंत या गाडय़ांना नवे रूप देण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

सध्याच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या आवडीनिवडीनुसार नवे बदल करण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाकडून करण्यात आल्या आहेत. डब्यांमधील अंतर्गत सजावटीत बदल करण्याच्या या प्रकल्पाला उत्कृष्ट गाडय़ा असे नावही दिले आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसमध्ये या प्रकल्पानुसार बदल करण्यात आले व ही गाडी नव्या बदलासह ४ नोव्हेंबर २०१८ पासून प्रवाशांच्या सेवेत आली. डब्यात वेगळ्या रंगसंगतीसह नक्षी, पर्यटनस्थळांची चित्रे, खिडक्यांना पडदे, प्रत्येक डब्यात प्रवाशांसाठी एक माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक फलक, दिव्यांगासाठी ब्रेल स्टिकर्स, शौचालयात सिरामिक टाइल्स यासह स्वच्छतागृहाच्या रचनेत बदल केले. हे बदल प्रवाशांच्या पसंतीस पडले.

या पाच गाडय़ांच्या डब्यांमधील बदल करण्याचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे बदल करण्यासाठी प्रत्येक गाडीमागे रेल्वे प्रशासनाला ६० लाख रुपये खर्च येत असल्याचे सांगण्यात आले.

बदलाचे मानकरी

उत्कृष्ट गाडय़ा प्रकल्पांर्तगत रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेवरील एकूण सहा गाडय़ांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील प्रगती एक्स्प्रेस नव्या बदलासह सेवेत आली. आता मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन, इंद्रायणी यासह सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी मार्गावर धावणारी सेवाग्राम एक्स्प्रेस, सीएसएमटी ते सोलापूर-सीएसएमटी मार्गावरील सिद्धेश्वर एक्स्प्रेस, सीएसएमटी ते अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस या गाडय़ांच्या अंतर्गत सजावटीतही प्रगती एक्स्प्रेससारखेच बदल केले जाणार आहेत.

प्रवाशांसाठी मध्य रेल्वेवरील आणखी पाच एक्स्प्रेसमधील डब्यांच्या अंतर्गत सजावटीत बदल केले जाणार आहेत. प्रगती एक्स्प्रेससारखेच हे बदल होतील. मार्च २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

– सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे