मध्य रेल्वेची चाचपणी, ‘आरडीएसओ’च्या सूचना

मुंबई : मुंबई-नाशिकदरम्यान लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी ‘आरडीएसओ’ने नुकतीच या मार्गाची पाहणी करून त्यातील अडचणी निदर्शनास आणल्या आहेत.

मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. तिच्या अनुषंगाने मध्य रेल्वेने तांत्रिक अभ्यास केला. रेल्वेच्या रिसर्च स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड डिझाइन ऑर्गनायझेशननेही (आरडीएसओ) मुंबई-नाशिक मार्गाची पाहणी केली. कसारा-इगतपुरीदरम्यानचा घाट हाच नाशिकपर्यंत लोकलसेवा सुरू करण्यातील मुख्य अडथळा असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, तसेच अन्य तांत्रिक अडचणीही आहेत, असे निरीक्षण ‘आरडीएसओ’च्या अधिकाऱ्यांनी नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरडीएसओने मध्य रेल्वेला मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरू करण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. लोकल गाडय़ांचे मोठे दरवाजे आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल चालवणे गरजेचे आहे. घाटमार्ग असल्याने लोकलला मोठय़ा क्षमतेची ब्रेकयंत्रणा बसवणे आवश्यक आहे, इत्यादी सूचना ‘आरडीएसओ’च्या अधिकाऱ्यांनी केल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष बांधणीची लोकल

मुंबई-नाशिक मार्गासाठी विषेष लोकल बांधण्याबाबत मध्य रेल्वेने चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्याकडे विचारणाही केली आहे. अशा प्रकारची लोकल तीन महिन्यांत बांधून पाठवण्याचे आश्वासन कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गाडीत प्रसाधनगृहे?

सध्या मुंबई ते नाशिक दरम्यान पंचवटी, मनमाड, गोदावरी आणि राज्यराणी या मेल-एक्स्प्रेस गाडय़ा धावतात. लोकलसेवा सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल. परंतु मुंबई ते नाशिक प्रवासासाठी चार तास लागतात, हे लक्षात घेतले तर मेल-एक्सप्रेस गाडय़ांप्रमाणे लोकलमध्येही प्रसाधनगृहांची सुविधा असेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.