मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणून पाहिले जात असलेल्या किनारी मार्ग आणि चारकोप-मानखुर्द मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडला केंद्रीय पर्यावरण खात्याने अखेर गुरुवारी हिरवा कंदील दाखविला.
केंद्रीय पर्यावरण विभागाच्या कचाटय़ात सापडलेल्या हजारो कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मान्यता मिळविण्याबरोबरच मुंबईतील चटईक्षेत्र निर्देशांकावरील र्निबध हटविण्यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया यांच्या नेतृत्वखाली राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी केंद्रीय पर्यावरण सचिव राजगोपालन यांची भेट घेऊन सीआरझेडपायी दीड वर्षे रखडलेले हे प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली.  केवळ काही ठिकाणीच समुद्रात खांब उभारून तसेच काही ठिकाणी किनाऱ्यावर भराव टाकून किनारी मार्ग बांधला जाणार असून त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचे तपशीलवार सांगण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पांना मान्यता देण्याबाबत पर्यावरण विभागाने अनुकूलता दाखविल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
मेट्रो २ साठी चारकोप आणि मानखुर्द येथे बांधण्यात येणाऱ्या कारशेडलाही पर्यावरण विभागाने हरकत घेतली होती. या ठिकाणी कांदळवनाच्यावर कारशेड उभारा मात्र तेथे गाडय़ा धुता येणार नाहीत, असे र्निबध घालण्यात आले होते. मात्र या अटींचे पालन करायचे झाल्यास प्रकल्पाच्या किंमतीत ५०० कोटींची वाढ होऊन तो तोटय़ाचाच होईल, अशी भूमिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली होती. गुरुवारी हीच भूमिका पर्यावर विभागास समजावून सांगण्यात आली. कांदळवनाचे अन्यत्र पुनरेपण केले जाईल, तसेच गाडय़ा धुतल्यानंतरचे पाणी प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाईल, अशी ग्वाही प्राधिकरणाने दिल्यानंतर याबाबत फेरप्रस्ताव सादर करा. त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचेही या अधिकाऱ्यांने सांगितले.
मुंबईचा ४० टक्के भूभाग सीआरझेडबाधित असून सीआरझेड २ च्या प्रभावक्षेत्रात सुमारे तीन लाख झोपडय़ा आणि १७ लाख लोक राहतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी भागीदारीची असलेली अट शिथिल करावी, जुन्या इमारतींच्या पुनर्वसनासाठीची योजनाच याही ठिकाणी लागू करावी अशी मागणी करण्यात आली. नवी मुंबईतील सीआरझेडबाधित १२४० हेक्टर जमीन मुक्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मात्र हे दोन्ही विषय गुंतागुंतीचे असल्याने त्यावर विचारांती निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे समजते.                                         
किनारी मार्ग    : नरिमन पॉइंट ते कांदिवली
            लांबी    : ३६.६० किमी
             खर्च    : अंदाजे १० हजार कोटी