करोना आणि इतर आजारांची लक्षणे ओळखण्याचे आव्हान

मुंबई: पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची आणि करोनाची लक्षणे एकसारखी असतात. त्यामुळे ताप आणि सर्दी म्हणून लोकांनी करोनाचा आजार अंगावर काढू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील जनतेला के ले.

करोनाच्या लढाईत आता डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरल्याने या लढ्याला बळ मिळाले असून डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील करोनाची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होताहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचनाही  ठाकरे यांनी केल्या.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आयोजित केलेल्या करोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे उपस्थित होते. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत राज्यभरातील २१ हजार ५०० डॉक्टर सहभागी झाले होते.

गेल्या वर्षी खासगी डॉक्टरांमध्ये देखील करोना संसर्गाची मोठ्या प्रमाणावर भीती होती. मुखपट्टी,व्यक्तीगत सुरक्षा साधणे तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या तुटवड्यामुळे त्यांनी आपले दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली होती. परंतु आता  दुसऱ्या लाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर, जनरल फिजिशियन, विविध रोग तज्ज्ञ, मैदानात उतरले आहेत. त्यामुळे करोना विरोधातील लढ्याला बळ मिळाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

माझा डॉक्टर संकल्पनेतून सातत्याने राज्यभरातील डॉक्टरांशी संवाद साधत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. करोनाची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाहीत. अशा वेळी रुग्णास ओळखण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आहे. विशेषत: प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते पाहिले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे त्याकडेही डॉक्टरांनी काळजीपूर्वक लक्ष्य द्यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी के ल्या.

दुसऱ्या लाटेतील विषाणू घातक असून रुग्णांवरही जास्त काळ उपचार करावे लागत आहेत.   तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी अधिक सावधानता  बाळगण्याचे आवाहन केले.