राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवनेरी गाडय़ांच्या चालकांच्या गणवेशामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यांचा खाकी गणवेश बदलून त्यांना निळा आकर्षक गणवेश देण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने खासगी गाडय़ांच्या स्पर्धेला सामोरे जाताना गाडय़ांच्या सर्वांगीण बदलामध्ये बस चालकांचा गणवेशही बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवनेरी या मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाडय़ांच्या चालकांचा परंपरागत खाकी गणवेश बदलून नव्या आधुनिक गाडीला साजेसा असा निळा शर्ट, गडद निळी पॅंट आणि डोक्यावर फेल्ट हॅट असा करण्यात आला आहे. पुढील आठवडय़ापासून या गणवेशातील चालक शिवनेरी गाडय़ा चालविताना दिसतील, अशी माहिती एसटीचे सहाय्यक जनसंपर्काधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
प्रवाशांशी या चालकांनी सौहार्दपूर्ण वागावे यासाठी शिवनेरीच्या सर्व चालकांना पुण्याजवळईल भोसरी येथील एसटी महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.