महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे समीर भुजबळ, मुलगा पंकज भुजबळ यांच्याविरोधात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल केले. २० हजार पानांच्या आरोपपत्रात एकूण १७ आरोपी आहेत. अधिकारी व राजकीय नेत्यांच्या संगनमताने विकासकाला ८० टक्के फायदा करून दिल्याचा प्रमुख आरोप छगन भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
छगन भुजबळांवरील आरोप
– महाराष्ट्र सदनाचे काम चमणकर समूहालाच मिळवून दिले
– चमणकर समूहाला लाभदायक ठरतील असे शासन निर्णय घेतले
– आरटीओने चमणकर समूहाला कंत्राट देण्यास नकार दिला होता. पण, छगन भुजबळांनी आरटीओच्या अधिका-यांच्या बैठकांवर बैठक बोलावून चमणकर समूहाला महाराष्ट्र सदनाचे कंत्राट मिळवून दिले
– चमणकरांसोबत इतर कंत्राटदारांना विविध मार्गे पदाचा गैरवापर करुन फायदा मिळवून दिला
– राज्य सरकारचे नुकसान केले, या बदल्यात साडेतेरा कोटी रुपये काळा पैसा मिळवला
– विकासकाचा नफा लपवला
– विकासकाला नियमानुसार २० टक्क्यांऐवजी ८० टक्के बेकायदेशीर फायदा मिळवून दिला
समीर आणि पंकज भूजबळ यांच्यावरील आरोप
– बोगस कंपन्या स्थापन केल्या
– मंत्र्यांचे नातेवाईक असून देखील शासकीय कंत्राट मिळवले
– महाराष्ट्र सदन प्रकल्पात बेकायदेशीर नफा मिळवण्यासाठी चमणकर समूहाला सहकार्य केले
– महाराष्ट्र सदन प्रकल्पात विविध उपकंपन्या स्थापन करुन त्याद्वारे कंत्राटे मिळवली
– छगन भुजबळ आणि चमणकर समूहाने बेकायदा मिळवलेले साडेतेरा कोटी रुपये आपल्या कंपन्यांच्या विविध बॅंक खात्यात वळते केले.