छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी पहिलं आरोपपत्र गुरुवारी दाखल केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात दाखल झालेल्या ६५० पानांच्या या आरोपपत्रात पोलिसांनी घटनेचं सीसीटीव्ही फुटेज, मुख्य आरोपी ऑडिटर नीरज देसाईची भूमिका, साक्षीदारांचे जबाब, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन अहवाल जोडले आहेत. याप्रकरणी अटकेत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांविरोधात लवकरच पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात येणार आहे.

१४ मार्च २०१९ ला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाशेजारी असलेला पूल कोसळून सात जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले होते. नीरज देसाच्या कंपनीने हा पूल वापरासाठी योग्य असल्याचा अहवाल पालिकेला सादर केला होता. या दुर्घटनेनंतर १८ मार्च रोजी नीरज देसाईला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात आयपीसी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या असून मार्च महिन्यात हिमालय पूल कोसळून या दुर्घटनांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबईवर जी काही संकटे ओढावली आहेत. त्या प्रत्येक संकटानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी या घटनेतील पीडितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासोबतच सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. मार्च महिन्यात हिमालय पूल कोसळल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवून शोक व्यक्त केला. आता याच पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी पहिलं आरोपपत्र कोर्टात सादर केलं आहे.