सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविणारे ‘चतुरंग प्रतिष्ठान’ही फक्त संस्था नसून ती एक चळवळ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी केले.
‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या चाळीशीनिमित्त शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या आनंद आणि कृतज्ञता सोहळ्यात त्या बोलत होत्या. मेहता यांच्या हस्ते ‘चतुरंग’ला मदत करणाऱ्या गौरी वेलणकर, नाटककार सुरेश खरे, रुपारेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रधान, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, मौज प्रकाशनाचे संजय भागवत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष गजानन दाहोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
‘चतुरंग’ चाळीशीच्या या ‘आनंद सोहळ्या’ची सुरुवात कवी-गीतकार गुलजार यांच्या साहित्यकृतीवर आधारित असलेल्या ‘बात पश्मीने की’ या स्वरमैफिलीने झाली. सचिन खेडेकर, विभावरी आपटे, स्वरदा गोडबोले, जितेंद्र अभ्यंकर, धवल चांदवडकर आणि सहकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ़‘नाटय़संगीत शैलीदर्शन’ या नाटय़पदांच्या मैफिलीने कार्यक्रमाची सांगता झाली.