|| शैलजा तिवले

बाधित असूनही बिगरकरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबई : करोनाबाधित असूनही गर्भवती महिलेने लवपून ठेवत मालाड येथील खासगी प्रसूतिगृहात उपचार घेतल्याने रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांना करोनाची बाधा झाली आहे. अशा रीतीने फसवणूक करत बिगरकरोना रुग्णालयात बाधित रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह इतर रुग्णांना बाधा होण्याची शक्यता होती. याशिवाय बाधित डॉक्टरांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही मनस्ताप सहन करावा लागला आहे.

मालाड येथील ३५ वर्षीय गर्भवती महिला २२ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास आमच्या प्रसूतिगृहात उपचारासाठी आली होती. प्रसूती कालावधी पूर्ण झाला होता आणि तिला प्रसूती वेदनाही होत होत्या. नेहमी उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने आम्ही येथे आलो आहोत, असे तिच्या पतीने सांगितले. आपत्कालीन स्थितीत तिच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याने रात्री आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. प्रसूतीआधी सुरक्षितता म्हणून महिलांची करोना चाचणी केली जाते. याबाबत विचारणा केल्यावर करोना चाचणी न केल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दुसऱ्यादिवशी सकाळी करोना चाचणीसाठी प्रयोगशाळेतील तज्ज्ञ बोलाविल्यानंतर तिच्या पतीने आम्ही तिची चाचणी केली असून ती करोनाबाधित असल्याचे सांगितले. आमच्यासाठी हा धक्काच होता. कारण रात्रभर रुग्णालयातील माझ्यासह सर्वजण तिच्याजवळ वावरत होते आणि इतर प्रसूती झालेल्या, होणाऱ्यामाताही उपचार घेत होत्या. त्यामुळे या सर्वांनाच याचा धोका होता, असे तिच्यावर उपचार करणाऱ्याडॉ. चार्मी देशमुख यांनी सांगितले.

त्यानंतरही रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून मी तिला जवळच्या करोना रुग्णालयात घेऊन गेले. स्वत: तिची प्रसूती केली. घरी जाईपर्यत दररोज रुग्णालयात जाऊन तिची तपासणी करत होते. चार दिवसांनी बाळ आणि आई दोघेही सुखरूप घरी परतले. परंतु काही दिवसांनी मलाच ताप आला आणि करोनाबाधित झाल्याचे निदान झाले. दुसऱ्याआठवड्यात माझा खोकला वाढला. संसर्ग फुप्फुसांपर्यंत पोहोचल्याने मला खासगी करोना रुग्णालयात दाखल केले. सहा दिवस मी उपचार घेतले. सध्या मी घरी परतले असले तरी अजूनही मला धाप लागत आहे. त्या महिलेच्या कुटुंबाने आजार लपवून ठेवल्याने मला आणि माझ्या कुटुंबाला त्रासातून जावे लागले, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

त्या महिलेच्या आधीच्या डॉक्टरांना ती करोनाबाधित असल्याचे समजले होते. यावर त्यांनी काही करोना रुग्णालयांची नावेही सांगून तेथे दाखल होण्याचा सल्ला दिला होता. परंतु करोना रुग्णालयात प्रसूती करायची नाही, या अट्टहासामुळे खोटे सांगत ते आमच्याकडे उपचारासाठी आले होते. करोनाबाधित असल्याचे त्यांनी सांगितले असते तरी मी त्यांना आमच्याकडील इतर रुग्णांप्रमाणे करोना रुग्णालयात दाखल करत स्वत: उपचार केले असते, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

रुग्णांमध्ये जनजागृती आवश्यक

रुग्णांना उपचार मिळणे हा जसा त्यांचा हक्क आहे, तसा त्यांनीही आजाराविषयी सर्व खरी माहिती देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच डॉक्टरांनी कोणत्याही परिस्थितीत सेवा देणे हे जसे कर्तव्य आहे, तसेच त्यांची सुरक्षितता हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे केवळ रुग्णांच्या हक्काविषयी जागरूकता येणे पुरेसे नसून त्यांच्या जबाबदारीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी सांगितले.