चेंबुरमधील तीन दिवसांच्या बाळाची आणि त्याच्या आईची करोनाची पहिली चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्यांची खासगी लॅबमध्ये चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आई आणि तान्ह्या बाळाला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

कस्तुरबा रुग्णालयात तान्ह्या बाळाला आणि आईला हलवल्यानंतर त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती. पहिल्या चाचणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?
खासगी रुग्णालयात २६ मार्चला एका महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर तिला आणि तिच्या बाळाला एका विशेष खोलीत हलविण्यात आले. त्यानंतर २४ तासांच्या आतच आम्हाला या खोलीतून दुसरीकडे जाण्यास सांगण्यात आले, असे या महिलेच्या पतीनं सांगितलं होतं. खासगी प्रयोगशाळेत साडेतेरा हजार रुपये खर्च करून माझ्यासह पत्नी आणि बाळाची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात पत्नीसह बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.