महाराष्ट्र सदन तसेच इतर ११ प्रकरणांच्या घोटाळ्यातून तब्बल ८७० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोन दिवसांची सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली. सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी देण्याचा निर्णय दिला.
भुजबळ यांना सोमवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले होते. अटक केल्यानंतर सोमवारची रात्र भुजबळ यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयातच घालवली होती. भुजबळ तपासात सहकार्य करीत नसल्यामुळे त्यांना सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. सोमवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात गेलेल्या भुजबळ यांना तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.
छगन भुजबळ यांनी राज्यात मंत्री असल्याचा फायदा घेत पैसा जमा केल्याचा युक्तिवाद सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल संशय असून, त्यांच्याकडून झालेल्या आर्थिक व्यवहारातील दस्तावेज समाधानकारक नाहीत, असे न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत ते सहकार्य करीत नसल्याचेही न्यायालयाकडे स्पष्ट केले. या प्रकरणात आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा युक्तिवाद भुजबळांकडून करण्यात आला. समीर आणि पंकज भुजबळ यांच्या सगळ्या व्यवहारांची माहिती आपल्याला नाही. त्यामुळे त्याबद्दल माहिती देऊ शकत नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. आपली बाजू मांडताना भुजबल भावूक झाले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या प्रकरणी महासंचालनालयाने याआधीच समीर भुजबळ यांना अटक केली आहे. समीर हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना आर्थर रोड येथील मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे. गेल्या महिन्यात पंकज भुजबळ यांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यांना काही तासांच्या चौकशीनंतर जाऊ देण्यात आले होते. मात्र पंकज यांनी भारताबाहेर जाऊ नये यासाठी महासंचालनालयाने त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेतला आहे. सोमवारी छगन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास भुजबळ आपल्या वकिलासोबत महासंचालनालयाच्या कार्यालयात आले. मात्र वकिलाला सोबत येण्यास महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि त्यानंतर भुजबळ यांची सलग ११ तास चौकशी करण्यात आली. या कालावधीत भुजबळ यांना अनेक प्रश्नावलीला तोंड द्यावे लागले. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अटक करण्याचा निर्णय घेतल्याचे महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.