महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. भुजबळ यांना गुरूवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ईडीने भुजबळांच्या अधिकच्या चौकशीसाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने भुजबळांच्या ३१ मार्चपर्यंत १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले.

दरम्यान, आज सकाळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी समीर यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर आता समीर भुजबळ यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले.

छगन भुजबळ यांनी अटकेपूर्वीच्या ११ तासांच्या चौकशीत काहीच सहकार्य केले नव्हते. सर्व प्रश्नांना मला माहिती नाही, असे उत्तर दिल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता. याशिवाय, समीर भुजबळ यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही मला त्यांच्या व्यवहारांबद्दल कोणती माहिती नसल्याचे भुजबळांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाची परवानगी घेऊन आज त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.