कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांचा छडा लावण्यासाठी पोलिसांना काही अवधी दिला जाणार असून त्या मुदतीत तपास न लागल्यास मात्र तपासाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही दिवसांत हल्लेखोरांना शोधून न काढल्यास राज्य सरकारला सीबीआयकडे तपास सोपविण्यासाठी पावले टाकावी लागतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कॉ. पानसरे यांच्या हत्येला एक महिना उलटूनही हल्लेखोरांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने तो सीबीआयकडे सोपविण्याची मागणी  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मात्र, हल्लेखोरांची माहिती मिळाली नसली तरी तपासाला दिशा मिळाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वतोपरी सहकार्य घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत व शासनाने ते उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. पोलिसांना आणखी काही वेळ तपासासाठी देण्याची आवश्यकता असून तपासाच्या सध्याच्या अवस्थेत तो सीबीआयकडे देणे योग्य होणार नाही. मात्र ठरावीक मुदतीत हल्लेखोरांना न शोधल्यास तपासासाठी वेगळा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.