मेट्रो कारशेडसाठी होत असलेल्या आरेमधील वृक्षतोडीवर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आदित्य यांच्या नाराजीच्या संदर्भाने बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. “आरेमधील झाडांची कत्तल आम्हाला देखील मान्य नाही. पण वृक्षतोडीमागील उद्देश समजून घेतला पाहिजे”, असे मत व्यक्त केलं.

महाजनादेश यात्रा रविवारी पुण्यात दाखल झाली. बारामतीतून पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईत मेट्रोचे काम सुरू असून, मेट्रोच्या कारशेडसाठी जागा निवडण्यात आली आहे. यासाठी वृक्षतोड करण्यात येणार असून, त्याला मुंबईकरांसह शिवसेनेही विरोध दर्शविला आहे. या निर्णयावर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “झाडांची कत्तल आम्हाला देखील मंजूर नाही. त्या मागील उद्देश समजून घेतला पाहिजे. तसेच यावर आम्ही हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याला प्रतिसादही मिळाला. १३ हजार हरकती आल्या होत्या. झाडांच्या बाबतीत आदित्य ठाकरे यांचा विचार चांगला आहे. याबाबत आम्ही आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि त्यांनतर सविस्तर माहिती देणार आहोत. त्याचबरोबर आरेची जागा वन खात्याची नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अहवाल दिलेला आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी जपानकडून निधी मिळाला आहे. यासाठी एक वर्ष त्यांच्याकडून अभ्यास करण्यात आला आहे. इथे आम्ही काम सुरू होण्यापूर्वीच २३ हजार झाडे नव्याने लावली आहेत. अजून १३ हजार झाडे लावणार आहोत. तर आरेचा प्रकल्प हा कार्बन अल्ट्रा पॉझिटिव्ह प्रोजेक्ट आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.