मिरा रोड भागातील पूनम सागर परिसरात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिक बुधवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी घराबाहेर पडल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे मिरा रोड परिसरात करोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाही इथल्या काही नागरिकांना याचे गांभीर्य नाही तसेच त्यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.

मिरा भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या आता २२वर पोहचली असून एका ५० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे मिरा रोड आणि भाईंदरमधील मेडतीया नगर, नारायण नगर, नया नगर, विनय नगर, एस. व्ही. रोड, नित्यानंद नगर आणि आर. एन. ए. ब्रॉडवे हा परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला आहे.

मात्र, तरीही मिरा रोड येथील पूनम सागर भागात काही नागरिक बिनधास्तपणे नाश्ता करण्यासाठी रस्त्यावर आल्याचे पहायला मिळाले. तसेच नाश्त्याचे अन्नपदार्थ विकणारी व्यक्ती देखील सायकलवरुन कुठलीही तमा न बाळगता विक्री करीत होती.

संचारबंदी लागू असताना देखील नागरिक घराबाहेर पडत असल्यामुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आल्यानंतर देखील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.