राज्यातील मान्सूनचे अधिकृत आगमन अजूनही लांब असल्याचे वेधशाळा सांगत असली तरी त्याची वर्दी देणाऱ्या ढगांची दाटी मुंबई परिसरात झाली आहे. शुक्रवारी सकाळी काही भागांत तुरळक पावसाने हजेरीही लावली. मात्र याच ढगांमुळे दुपारचे तापमान ३५ अंश सें.पेक्षा वर पोहोचले.
वेधशाळेच्या अंदाजाला पार धुडकावून लावत आठवडाभराहून अधिक काळ रेंगाळलेला मान्सून केरळमध्ये प्रवेश करता झाल्याने उन्हात करपून निघत असलेल्या मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यातच शुक्रवार सकाळीच पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर मात्र ढगांनी दाटी करूनही दिवसभरात फक्त उकाडय़ाचाच सामना करावा लागला. सांताक्रूझ येथे कमाल ३५.३ अंश सें. तापमानाची नोंद झाली. गेल्या वर्षी ११ जून रोजी ३८ अंश सें. अशा गेल्या ६० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. सध्याचे तापमान त्या पातळीला गेलेले नसले तरी हे गेले काही दिवस सातत्याने ३५ अंश सें.वर पारा जात आहे. पुढील दोन दिवसांत तरी परिस्थितीत फारसा फरक होण्याची चिन्हे नाहीत.
दरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. रत्नागिरी जिल्हय़ात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस आला. संगमेश्वर, लांजा येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली. सावंतवाडी, गुहागर, कुडाळ, खेड, दोडामार्ग येथे २० मिमीहून अधिक पाऊस पडला. हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून पुढे सरकणार असला तरी राज्यात प्रवेश करणार नाही. मात्र शनिवार, रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी येण्याचा अंदाज असून मुंबई, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.